भाजपला विदर्भ राज्य बनविण्याची हीच खरी वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:12 PM2019-11-16T22:12:13+5:302019-11-16T22:13:19+5:30
युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेची भाजप सोबत असलेली युती आता संपुष्टात आली असून हा पक्ष केंद्र सरकारमधील एनडीएच्या घटक दलामधून बाहेर पडला. शिवसेनेने कायम विदर्भ राज्य निर्मितीला विरोध केला आहे व त्यांच्या विरोधामुळे भाजपनेही विदर्भाच्या जनतेला दिलेले वचन मोडले. मात्र युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली.
समितीच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक शनिवारी आमदार निवास येथे पार पडली. बैठकीमध्ये पारित झालेल्या ठरावाबाबत अॅड. वामनराव चटप व राम नेवले यांनी पत्रकारांना माहिती दिली. भाजपसाठी विदर्भ राज्याचे आश्वासन पाळण्याची हीच खरी वेळ आहे, असे चटप म्हणाले. अशावेळी राज्यातील संभाव्य सरकारने विरोध केला तर राज्यात अराजक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीत इतरही ठराव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी व तातडीची मदत देण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. विदर्भात विजेचे दर निम्मे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
विदर्भ राज्याच्या निर्मितीसह इतर मागण्यांसाठी येत्या २ डिसेंबरपासून १ मे पर्यंत शृंखलाबद्ध आंदोलन करण्यची घोषणा समितीने केली आहे. २ डिसेंबर रोजी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवाग्राम येथे सामूहिक उपोषण करून भाजपला सद्बुद्धी देण्यासाठी गांधीजींना साकडे घालणार आहे. त्यानंतर २४ डिसेंबरला जिल्हा व तालुकास्तरावर एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल. १५ जानेवारीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये मुख्य अभियंता महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. १५ ला अकोला, १७ ला अमरावती, २० जानेवारीला नागपूर, २२ जानेवारी चंद्रपूर व २४ जानेवारीला गोंदिया येथे आंदोलन होईल. १५ फेब्रुवारी २०२० ला विदर्भातील सर्व तालुक्यात रास्ता रोको आंदोलन आणि आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात १ मे रोजी विदर्भ बंदची घोषणा यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला ‘विदर्भ मिशन २०२३’ असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रबिरकुमार चक्रवर्ती, रंजना मामर्डे, अरुण केदार, देविदास लांजेवार, राजेंद्र आगरकर, अनिल तिडके, दिलीप भोयर, निळकंठ यावलकर, गुलाबराव धांडे आदी उपस्थित होते.