नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील वास्तव : तीन वर्षांत ८४ मनोरुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 08:15 PM2019-03-05T20:15:14+5:302019-03-05T20:15:59+5:30
विविध कारण तसेच वादांमुळे चर्चेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मनोरुग्णालयात तब्बल ८४ मनोरुग्णांचा मृत्यू झाला, तर या कालावधीत १८ मनोरुग्ण पळून गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध कारण तसेच वादांमुळे चर्चेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मनोरुग्णालयात तब्बल ८४ मनोरुग्णांचा मृत्यू झाला, तर या कालावधीत १८ मनोरुग्ण पळून गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांबाबत विचारणा केली होती. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ पासून या मनोरुग्णालयात किती रुग्ण आले, किती रुग्णांवर उपचार झाले, रुग्णांचा मृत्यू, पळून गेलेले रुग्ण, इत्यादींबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ पर्यंत प्रादेशिक मनोरुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात ९७ हजार २२१ रुग्ण दाखल झाले, तर आंतररुग्ण विभागात २ हजार ५४५ रुग्ण दाखल झाले. यातील ८४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पुरुष व महिला रुग्णांचा समावेश आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत रुग्णांच्या औषधोपचारावर ८२ लाख ७ हजार ९५६ रुपयांचा निधी खर्च झाला.
३५ टक्के पदे रिक्त
प्रादेशिक मनोरुग्णालयात रिक्त पदेदेखील डोकेदुखी बनली आहेत. रुग्णालयात ३७४ मंजूर पदे आहेत. त्यापैकी २४२ पदे भरली आहेत, तर १३२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३५ टक्क्यांहून अधिक आहे. गट ‘अ’मधील ४० टक्के, ‘ब’ गटातील ५० टक्के, ‘क’ गटातील २५ टक्के तर ‘ड’ गटातील ३९ टक्के पदे रिक्त आहेत.
मृत्यू कसे झाले?
दरम्यान, तीन वर्षांत ८४ मृत्यू झाले, हे प्रादेशिक मनोरुग्णालयाने स्पष्ट केले आहे. मात्र या मृत्यूंचे कारण काय होते, याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू नेमक्या कोणकोणत्या कारणांमुळे झाले, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
वर्षनिहाय मृत्यू
वर्ष मृत्यू
२०१६ ३०
२०१७ २१
२०१८ ३३