खरंच नागपूरला आशा भोसले, गुलजार येणार की गर्दीसाठीच खटाटोप?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:00 AM2018-10-06T10:00:51+5:302018-10-06T10:03:39+5:30
गुलजार आणि आशा भोसले म्हटले की, ‘मेरा कुछ सामान...’, ‘कतरा कतरा मिलती है...’ अशी अनेक गाणी मनात तरळू लागतात. एक भावनांना शब्दरूप देणारा जादूगर तर दुसरी सुरेल स्वरांनी या शब्दांना पुन्हा भावना देणारी आशा.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुलजार आणि आशा भोसले म्हटले की, ‘मेरा कुछ सामान...’, ‘कतरा कतरा मिलती है...’ अशी अनेक गाणी मनात तरळू लागतात. एक भावनांना शब्दरूप देणारा जादूगर तर दुसरी सुरेल स्वरांनी या शब्दांना पुन्हा भावना देणारी आशा. एखाद्या कार्यक्रमासाठी हे दोघे येणार म्हटल्यावर ती तर रसिकांसाठी अविस्मरणीय पर्वणीच. अशा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून तुम्ही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी गेलात, पण हे दोघे आलेच नाहीत तर..? हाच प्रश्न आम्हालाही एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून पडला आहे. साहित्यिक अमृता प्रीतम यांच्यावरील होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी म्हणून आशाताई व गुलजार यांच्या नावाचा उल्लेख असल्याने आणि आयोजकांसह कुणालाच काही कल्पना नसल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हिंदी आणि पंजाबी साहित्य जगताला एका वेगळ््या उंचीवर पोहोचविणाºया आणि स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक नावाजलेली लेखिका व कवयित्री म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त अमृता प्रीतम यांच्या साहित्य कृतीवर आधारित हा कार्यक्रम येत्या ७ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता चिटणवीस सेंटर येथे होत आहे. आयोजकांमध्ये चिटणवीस सेंटरसह विदर्भ साहित्य संघ या साहित्य जगतातील नामवंत संस्थेचाही समावेश आहे. यात सहभागी म्हणून ज्यांच्या नावांचा उल्लेख आहे, त्यात पहिले नाव आशा भोसले यांचे व शेवटचे नाव संपूर्णसिंह कालरा म्हणजेच गुलजार यांचे आहे. साहजिकच या दोन नावांमुळे कुणाच्याही भुवया उंचावणारच. त्यामुळे याबाबत आयोजकांना विचारावे म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाºयांना विचारणा केली. त्यांनाही याबाबत नीटसे माहिती नव्हते. ‘ते येणार नाहीत, कदाचित त्यांची गाणी आणि कविता सादर होणार असण्याची शक्यता आहे’ असे उडते उत्तर त्यांच्याकडून मिळाले. पण तसा स्पष्ट उल्लेख करता आला असता. मग ही कार्यक्रम पत्रिका कुणी तयार केली, संमती कुणी दिली आणि छापून आल्यानंतरही कुणाच्याच कसे लक्षात आले नाही, हा प्रश्न पडतो. चिटणवीस सेंटरशी याबाबत बोलणे होऊ शकले नाही. इतर सहभागी वक्त्यांना याबाबत विचारले असता त्यांनीही याविषयी काही कल्पना नसल्याचे सांगितले. इतर नावे लहान आहेत, असे म्हणण्याचे कारण नाही, पण वि.सा. संघ किंवा आयोजकांना तसे म्हणायचे आहे का, हे त्यांचे त्यांनीच समजून घ्यावे. सांस्कृतिक आणि विशेषत: साहित्यिक कार्यक्रमांसाठी प्रेक्षक येत नाहीत. पण गर्दी खेचण्यासाठी अशाप्रकारे नामवंत व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करायचा आणि वेळेवर स्वत:च स्वत:ची फजिती करून घ्यायची, ही मानसिकता समजण्यापलीकडे आहे. कदाचित साहित्य जगतालाही सवंग लोकप्रियता मिळविण्याची लागण झाली आहे का, हा विचार शेवटी मनात येतोच.
विदर्भ साहित्य संघाने यापूर्वीच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ही संकल्पना आवडल्याने चिटणवीस सेंटरतर्फे तो पुन्हा आयोजित केला जात आहे. आशा भोसले आणि गुलजार यांच्या नावांच्या उल्लेखाबाबत अधिक कल्पना नाही. कदाचित त्यांची गाणी आणि कविता सादर होतील. पण हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे. श्रोत्यांनी नक्की उपस्थित राहावे.
- मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ