हिंसक गुन्ह्यांमागची जाणून घेणार कारणे; विधी विद्यापीठ व पोलिसांत सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 10:23 AM2021-07-21T10:23:43+5:302021-07-21T10:24:14+5:30
Nagpur News हिंसक गुन्ह्यांमागची बारकाईने कारणमीमांसा केल्यानंतर असे गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासंबंधाने राष्ट्रीय विधी विद्यापीठाची मंडळी संशोधन करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील हिंसक गुन्ह्यांमागची बारकाईने कारणमीमांसा केल्यानंतर असे गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासंबंधाने राष्ट्रीय विधी विद्यापीठाची मंडळी संशोधन करणार आहेत. शहर पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्यात मंगळवारी या संबंधीचा सामंजस्य करार झाला. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी स्वाक्षरी केली.
नागपुरात वारंवार घडणारे रक्तरंजित गुन्हे, हिंसक घटना सर्वत्र चर्चा अन् चिंतनाचा विषय ठरल्या आहे. त्यामुळे त्यामागची पार्श्वभूमी काय, गुन्हेगारांची मानसिकता आणि संबंधित कारणांचा बारीकसारीकपणे अभ्यास करतील. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती शहर पोलीस विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाला उपलब्ध करून देतील. त्यानंतर असे गुन्हे कसे रोखायचे, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर तंत्रशुद्ध विचारविमर्श केला जाईल. त्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची, उद्बोधनाची गरज आहे, तेसुद्धा ठरवले जाईल आणि नंतर उपाययोजना अमलात आणल्या जातील, असे आजच्या सामंजस्य करारात ठरवण्यात आले.
हे आहे संशोधकांचे पथक
तर, विधी विद्यापीठाचे सहा. प्रा. डॉ. रेंगास्वामी स्टॅलिन (सामाजिक शास्त्र, गुन्हेगारी आणि न्याय वैज्ञानिक शास्त्र), सहा. प्रा. डॉ. हिमांशू पांडे (पुरावा, कायदा), सहा. प्रा. त्रिशा मित्तल (गुन्हेगारी, कायदा) आणि पोलीस विभागाकडून उपायुक्त विनीता साहू, लोहित मतानी, गजानन शिवलिंग राजमाने यांचे संयुक्त पथक संशोधनाचे कार्य करणार आहे.
---