नागपुरातील शिक्षकांची कारणे आली अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:37 PM2018-09-20T23:37:20+5:302018-09-20T23:38:52+5:30
निवडणुकीचे काम टाळण्यासाठी हिंगणा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. मोठ्या संख्येने शिक्षकांकडून आरोग्याच्या तक्रारी आल्यामुळे तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची गंभीरता लक्षात घेता, शिक्षकांचे आरोग्य जाणून घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. या तपासणीत जर शिक्षक सृदृढ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे फर्मान निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले. त्यामुळे शिक्षकांची कारणे त्यांच्याच अंगलट आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीचे काम टाळण्यासाठी हिंगणा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. मोठ्या संख्येने शिक्षकांकडून आरोग्याच्या तक्रारी आल्यामुळे तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची गंभीरता लक्षात घेता, शिक्षकांचे आरोग्य जाणून घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. या तपासणीत जर शिक्षक सृदृढ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे फर्मान निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले. त्यामुळे शिक्षकांची कारणे त्यांच्याच अंगलट आली.
हिंगणा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकात २२३ मतदान केंद्रावर होणार आहे. त्यासाठी १३०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी शिक्षकांनाही ड्युटीवर लावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबर रोजी निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यात अनेक शिक्षक आले नव्हते. अनेक शिक्षकांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून निवडणुकीचे काम रद्द करण्यासाठी अर्ज केले. शिक्षकांची ही कारणे तालुका निवडणुक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना १५ सप्टेंबर रोजी एक पत्र पाठवून निर्देश दिले. यात सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यास तथ्य सामोर येईल. जर तपासणीत ते ठीक आढळले तर त्यांच्या विरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे शिक्षकांमध्ये चांगलाच घबराट पसरली आहे. या पत्रात निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार करण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. तपासणीत जे शिक्षक सृदृढ आढळतील, त्या शिक्षकांवर निवडणूक आयोगाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी न्यायोचित कारवाई करण्यात यावी, असेही स्पष्ट केले आहे.
शिक्षकांची यादी पाठविली विभागाला
ज्या शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे अर्ज दिले आहे, त्यांच्या अर्जासह शिक्षकांच्या नावाची यादी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविली आहे. ताबडतोब शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करून अभिप्राय पाठविण्याचे निर्देश दिले आहे.