Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:11 AM2019-10-04T00:11:01+5:302019-10-04T00:12:38+5:30
उमेदवारांची नावे जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. उमेदवारी अर्जापासून वंचित राहिलेल्या अनेक इच्छुकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमेदवारांची नावे जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. उमेदवारी अर्जापासून वंचित राहिलेल्या अनेक इच्छुकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले आहे. आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर त्यांना शांत करण्याची जबाबदारी आली आहे. काँग्रेसचे दोन आणि भाजपच्या एका नगरसेवकाने पक्षाविरुद्ध बंड पुकारले आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी मध्य नागपुरातून विकास कुंभारे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे बुधवारी बडकस चौकात निदर्शने करून विरोध दर्शविला. दक्षिणमध्ये आपले तिकीट कापून मोहन मते यांना दिल्याने आमदार सुधाकर कोहळे नाराज झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रात्री कोहळे यांना बोलावून समजावले. पक्षात बंडखोरी आजही सुरु होती. पक्षाचे नगरसेवक, माजी उपमहापौर सतीश होले यांनी दक्षिणमधून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला.
दुसरीकडे काँग्रेसमध्येही बंडखोरी दिसून आली.नगरसेवक मनोज सांगोळे यांनी उत्तर नागपुरातून तिकीट न मिळाल्याने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य नागपुरातून नगरसेवक रमेश पुणेकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिणमधून प्रमोद मानमोडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांचे म्हणणे आहे की, पक्ष काम करणाऱ्यांना तिकीट देत नाही. जनता त्यांच्यासोबत आहे. ते विजयी होतील. यादरम्यान एकाही मुस्लीम समाजाला तिकीट न मिळाल्याने दुखावलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यात शहर उपाध्यक्ष अशरफ खान, शाहीद अंसारी, शेख जावेद, लियाकत अली, रजा अली, तोहसीफ सिद्दिकी, सना खान, अबरार खान, शेख वसीम, सलीम कुरैशी यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनीही पूर्व नागपुरातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे माजी पूर्व नागपूर संघटक यशवंत रहांगडाले यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.