विदर्भातील ३२ मतदारसंघात बंडखाेरांनी थोपटले दंड; स्वपक्षीयांचा होईल कमीअधिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 01:50 PM2024-11-05T13:50:30+5:302024-11-05T13:51:13+5:30

Nagpur : निम्म्या जागांवर आघाडी, महायुतीच्या उमेदवारांपुढे तगडे आव्हान

Rebels in 32 constituencies in Vidarbha | विदर्भातील ३२ मतदारसंघात बंडखाेरांनी थोपटले दंड; स्वपक्षीयांचा होईल कमीअधिक त्रास

Rebels in 32 constituencies in Vidarbha

राजेश शेगाेकार
नागपूर :
विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत अनेक मतदारसंघांमधील बंडाळी माेडून काढण्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले असले तरी तांत्रिकदृष्ट्या विदर्भातील ६२ पैकी ३२ मतदारसंघात बंडखाेरांनी अर्ज कायम ठेवले आहेत. परिणामी, महाविकास आघाडीच्या २२ उमेदवारांना तर महायुतीच्या २० उमेदवारांना स्वपक्षीयांचा कमीअधिक त्रास होईल, अशी चिन्हे आहेत. १५ जागांवर मात्र आघाडी व महायुतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरांचे तगडे आव्हान राहील. बंडखाेरांचा राग शांत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून विशेष दूत गेल्या दाेन दिवसांपासून कार्यरत हाेते. त्यामुळे विदर्भात बहुतेक ठिकाणी बंडाेबांचे ‘थंडाेबा’ झाल्याची चित्र आहे. उमेदवारी नाकारलेल्या अनेक माजी आमदारांनी अर्ज मागे घेतलेत, मात्र तरीही पक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांनी श्रेष्ठींचे न ऐकता उमेदवारी कायम ठेवत बंड पुकारले आहे. बंडखोरांनी दंड थोपटलेल्या मतदारसंघांमध्ये नागपूर मध्य, नागपूर पूर्व, रामटेक, काटाेल, सावनेर, उमरेड, कामठी, अहेरी, आरमाेरी, बल्लारपूर, वराेरा, सकाेली, तुमसर, राळेगाव, वणी, उमरखेड, अमरावती, बडनेरा, माेर्शी, अचलपूर, मेळघाट, वर्धा, हिंगणघाट, बुलढाणा, सिंदखेड राजा, रिसोड, वाशीम, अकोला पश्चिम, बाळापूर, आकोटचा समावेश आहे

माेर्शी, सिंदखेडराजात 'सांगली पॅटर्न'

लाेकसभेतील मैत्रीपूर्ण लढतीचा 'सांगली पॅटर्न' या वेळी अमरावती जिल्ह्यातील माेर्शी व बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. माेर्शीमध्ये महायुतीकडून अजित पवार गटाने देवेंद्र भुयार यांना तर भाजपने उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे. सिंदखेडराजामध्ये शिंदेसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि अजित पवार गटाचे मनाेज कायंदे हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. महायुतीत या दाेन्ही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होईल. 


१५ मतदारसंघात रंगणार चुरस 
नागपूर मध्य, रामटेक, अहेरी, आरमाेरी, बल्लारपूर, तुमसर, उमरखेड, अमरावती, बडनेरा, माेर्शी, वर्धा, हिंगणघाट, सिंदखेड राजा, रिसोड, अकोला पश्चिम या १५ मतदारसंघांमध्ये मात्र बंडखोरांचे तगडे आव्हान आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी हलबा समाजाला उमेदवारी न दिल्याने नाराजांनी एकत्र येऊन रमेश पुणेकर यांना नागपूर मध्य मतदारसंघात उतरविले आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी उद्धवसेनेचे विशाल बरबटे यांच्या विरोधात उमेदवारी कायम ठेवली आहे. अहेरीत मतदारसंघात भाजपचे अंबरीशराव आत्राम यांनी महायुती धर्म नाकारून धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उंचावला आहे. आरमाेरी मतदारसंघात माजी आमदार आनंदराव गेडाम, तुमसरमध्ये माजी आमदार सेवक वाघाये, उमरखेडमध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, अमरावतीत माजी आमदार जगदीश गुप्ता, रिसाेडमध्ये माजी आमदार अनंतराव देशमुख, हिंगणघाटमध्ये माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांचे अधिकृत उमेदवारांपुढे आव्हान आहे. ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे चिरंजीव अमोल यांनी सावनेरमध्ये, नागपूर पूर्वमध्ये आभा पांडे, बडनेऱ्यात प्रीती संजय बंड यांची बंडखोरी कायम आहे. तिथे आमदार रवी राणा यांच्यापुढे भाजपचे तुषार भारतीय यांंनी शड्डू ठोकला आहे. मोर्शीत काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी शरद पवार गटाचे गिरीश कराळे यांच्या विरोधात अर्ज कायम ठेवला आहे. बल्लारपूरमध्ये काँग्रेसच्या डाॅ. अभिलाषा गावतुरे, अकाेला पश्चिममध्ये भाजपचे हरिश आलिमचंदानी व उद्धवसेनेचे राजेश मिश्रा अपक्ष लढतीत आहेत. वर्धा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांच्यापुढे डाॅ. सचिन पावडे  यांचे आव्हान असेल.

Web Title: Rebels in 32 constituencies in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.