बंडखोरांनी वाढविले उमेदवारांचे टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:26+5:302021-07-07T04:10:26+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरांनी उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. सर्वाधिक बंडखोरी झाल्याने भाजपाची गोची झाली आहे. तर बंडखोर ...
नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरांनी उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. सर्वाधिक बंडखोरी झाल्याने भाजपाची गोची झाली आहे. तर बंडखोर उमेदवार समर्थनासाठी राजकीय पक्षाशी सलगी साधत आहे. तर बंडखोरांना शांत करण्यासाठी उमेदवाराबरोबरच नेत्यांचीही धावपळ सुरू झाली आहे.
कामठी तालुक्यात गुमथळा सर्कलमध्ये झालेल्या बंडखोरीची चर्चा अख्ख्या जिल्ह्यात आहे. येथे विद्यमान सदस्य व विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचे तिकीट कापून योगेश डाफ यांना दिली. तर अनिल निधान यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. याच सर्कलमधून भाजपाकडून तिसराही अर्ज कैलास महल्ले यांच्याकडून दाखल झाला. या तिघांकडेही बी फॉर्म नसल्याने हे उमेदवार अपक्ष म्हणून लढणार आहेत. याच सर्कलमध्ये काँग्रेसचे अनंता वाघ यांनी दिनेश ढोले यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलचे तिकीट काँग्रेसला गेल्याने राष्ट्रवादीचे भागेश्वर फेंडर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. येनवामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीलेशकुमार धोटे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवीत आघाडीचे उमेदवार समीर उमप यांच्याविरोधात दंड थोपटले. सावरगाव सर्कलमध्ये माजी आमदार सुनील शिंदे यांची सून अंजली सतीश शिंदे व राष्ट्रवादीचेच समर्थक माजी सरपंच मनीष फुके यांच्या पत्नी उषा मनीष फुके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून, पक्षासमोर आव्हान उभे केले. याच सर्कलमधून भाजपच्या ललिता खोडे यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला.
गोधनी सर्कलमधून काँग्रेसने विद्यमान सदस्य ज्योती राऊत यांचे तिकीट कापून कुंदा राऊत यांना उमेदवारी दिली. पण याच सर्कलमधून काँग्रेसचे अरुण राऊत यांनीही अर्ज दाखल केला. येथे भाजपाचे अधिकृत उमेदवार विजय राऊत यांना पक्षाच्या संगीता मेहर यांनी आव्हान उभे केले.
- शिवसेनेचे तालुकाप्रमुख काँग्रेसमध्ये
कुही तालुक्याचे शिवसेनाप्रमुख हरीश कढव यांनी पक्षाला खो देत काँग्रेसमध्ये कोलांटउडी घेतली व सरपंच पत्नीला काँग्रेसच्या तिकीटवर सिल्ली गणातून निवडणूक रिंगणात उभे केले.