बंडखोरांनो अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई होणार भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा
By योगेश पांडे | Published: October 31, 2024 08:48 PM2024-10-31T20:48:17+5:302024-10-31T20:48:41+5:30
नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नागपूर : विधानसभा निवडणूकीत महायुती व महाविकासआघाडीचे नेते पक्षांमधील बंडखोरीमुळे हैराण झाले आहेत. भाजपने तर बंडखोरांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे. जर बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत, तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. ज्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट न मिळाल्यानंतरदेखील उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी त्यांच्या भावना यातून व्यक्त केल्या आहेत. निवडणूक संचालन समितीने अशा पदाधिकाऱ्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेतले जातील असा विश्वास आहे. मात्र जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असे बावनकुळे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शरद पवार आणि कॉंग्रेसने फसवणूक केली आहे. रामटेक मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराची जमानत जप्त करण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक लढत आहेत. रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंचा ठरवून अपमान करण्यात येत आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. महाविकास आघाडीमधील कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष बंडखोरी करीत असताना तो नाना पटोले यांना का दिसत नाही असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांचा भाजपाकडून सन्मान केला जात होता. त्यांना बरोबरीने आणि भाजपापेक्षा अधिक जागा देत लोकसभा निवडणुकीत त्यांचे अठरा खासदार निवडून आले होते. आता ते मुख्यमंत्री पदाच्या लोभामुळे फसले आहेत. त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार सोडला आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
मनोज जरांगे यांचे आंदोलन सामाजिक असून राजकारणाशी जोडू नये. सत्तेमुळे समाजाला न्याय मिळतो. भाजपाने मराठा समाजासोबत न्यायाची भूमिका ठेवली आहे, असेदेखील ते म्हणाले.