बियाणे खरेदीची पावती घ्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:39+5:302021-06-16T04:11:39+5:30
कळमेश्वर : बनावट खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या बियाणांचे वेस्टन, ...
कळमेश्वर : बनावट खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या बियाणांचे वेस्टन, पिशवी, खरेदीची पावती पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामाची सुरुवात झाली असून बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. बियाणे पाकीट सीलबंद असल्याची खात्री व अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकऱ्यांनी गावपातळीवर अनधिकृत व्यक्तीकडून कृषी निविष्ठा खरेदी करू नये व प्रलोभनाला बळी पडू नये. कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.
--
बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास तसेच बियाणे उगवण संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभाग सोबत संपर्क साधावा.
- दीपक जंगले
कृषी अधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर
--
निगराणी समिती स्थापन
खरीप हंगाम २०२१-२२ करिता ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनधिकृत बियाणे विक्रीस प्रतिबंध घालण्याकरिता तसेच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या निविष्ठा उपलब्ध होण्याकरिता ग्रामस्तरावर अनधिकृत बियाणे विक्री प्रतिबंध निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहेत. यात अध्यक्ष म्हणून सरपंच तथा सदस्य म्हणून ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, शेतकरी गटाचे प्रतिनिधी, पोलीस पाटील, कृषी सहायक, ग्रामसेवक यांचा समावेश आहे.
---
निविष्ठा गुणवत्ता अभियान २०२१-२२ अंतर्गत तालुका स्तरावर गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक व्यापक होण्याचे दृष्टीने तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे यांचे अध्यक्षतेखाली भरारी पथकाची स्थापना करण्यात आली.