बेशीस्त वाहनचालक रडारवर, १,५३० ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित
By सुमेध वाघमार | Published: August 6, 2024 06:46 PM2024-08-06T18:46:38+5:302024-08-06T18:47:04+5:30
Nagpur : शहर आरटीओची कामगीरी; सात महिन्यांत १ कोटी ९४ लाख दंडही वसूल
सुमेध वाघमारे
नागपूर : शहरात वाहतूकीची शिस्त लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर शहरने बेशीस्त वाहनचालकांना रडावर घेतल्याचे दिसून येत आहे. मागील सात महिन्यांमध्ये १ कोटी ९४ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली. सोबतच काही गंभीर प्रकरणात तब्बल १,५३० वाहन चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले. अलिकडच्या काळात झालेली ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
वाहतूक नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. बहुतांशवेळा दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नाही. त्यामुळे मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९ व केद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २१ नुसार विविध गुन्हयाकरीता ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार आरटीओ शहरने जानेवारी ते जुलै या कालावधीत १,५३० वाहनचालकांची अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यांकरीता निलंबित केली आहे. सोबतच या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन ३,१०१ वाहनांवर कारवाई करीत १ कोटी ९४ लक्ष रु. दंड वसूल केला आहे.
या गुन्ह्यामुळे झाले लायसन्स निलंबित
धोकादायकरित्या वाहन चालविणे, दखलपात्र गुन्हयात वाहनाचा वापर करणे, दारु पिवून वाहन चालविणे, ट्रॅफिक सिग्नलचे पालन न करणे, अतिभार वाहतूक करणे, हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, अपघात प्रसंगी जखमींना मदत न करणे आदी गुन्हयांसाठी वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आले आहे.
तर, कायमस्वरुपी लायसन्स रद्द
"वाहतूक नियम पाळल्यास अपघाताचा धोका कमी होतो. परंतु काही वाहन चालक याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमानुसार दंडात्मक कारवाई, ड्रायव्हिंग लायसन्स निलंबन केले जाणार आहे. ज्यांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे त्या वाहन चालकांना सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविणे प्रतिबंधित असते. मात्र, ते रस्त्यावर वाहन चालवितांना आढळून आल्यास १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. तसेच, ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरुपी रद्द केले जाईल. वायुवेग पथकाकडून ही कारवाई सुरूच राहणार आहे."
-किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर