शहरातील पोलीस निवासस्थाने व रस्त्यांसाठी १२ कोटींवर निधीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:12 PM2018-03-15T22:12:50+5:302018-03-15T22:13:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांसाठी १२ कोटी २१ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नाने हा निधी गृह विभागासाठी मिळणार आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.
हुडको इमारत व लाल इमारत पोलीस लाईन टाकळी येथे सीलिंग प्लास्टर, टाईल्स बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ३ कोटी २४ लाख ४९ हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथे ४५० पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम, इमारत दुरुस्ती आदी कामांसाठी २ कोटी १७ लाख ८० हजार रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे.
पोलिसांसाठी डी, ई, व एफ बराकींचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामासाठी ३ कोटी ६४ लाख रुपयांना मान्यता मिळाली आहे. पोलीस मुख्यालय व पोलिसांच्या वस्तीतील अंतर्गत रस्ते दुरुस्ती करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. गेल्या तीन वर्षाच्या काळात शहर पोलीस विभागाला इमारती व निवासस्थाने बांधकामासाठी १५ वर्षात मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त निधी विद्यमान शासनाने दिला असल्याचे येथे उल्लेखनीय आहे.
याशिवाय पोलीस विभागाला जिल्ह्यातील कामासाठी १ कोटी ६२ लक्ष रुपये याआधी देण्यात आला आहे. हा निधी वितरितही करण्यात आला. रामटेक पोलीस चौकीसाठी १२ लक्ष, अमली पदार्थ गोदाम १५ लक्ष, काटोल कॅन्टीन १० लक्ष, नंदनवन पोलीस स्टेशन इमारत ३२ लक्ष, कान्होलीबारा पोलीस चौकी २५ लक्ष, खापा महिला बरॅक १६ लक्ष, सावरगाव पोलीस चौकी ९ लक्ष, केळवद ४ महिला गृह १४ लक्ष, कुही महिला गृह १५ लक्ष, रामटेक महिला गृह १५ लक्ष रुपयांची कामे करण्यात येत आहेत.