सहा अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम करण्याची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:33 PM2018-02-23T22:33:11+5:302018-02-23T22:33:22+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील सहा अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील सहा अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे.
या न्यायमूर्तींमध्ये न्या. प्रकाश नाईक, न्या. मकरंद कर्णिक, न्या. स्वप्ना जोशी, न्या. किशोर सोनवणे, न्या. संगीतराव पाटील व न्या. नूतन सरदेसाई यांचा समावेश आहे. सध्या न्या. प्रकाश नाईक व न्या. मकरंद कर्णिक मुंबई मुख्यपीठात, न्या. स्वप्ना जोशी नागपूर खंडपीठात, न्या. किशोर सोनवणे व न्या. संगीतराव पाटील औरंगाबाद खंडपीठात तर, न्या. नूतन सरदेसाई गोवा खंडपीठात कार्यरत आहेत. या सर्वांची २८ मार्च २०१६ रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. अतिरिक्त न्यायमूर्तींचा सुरुवातीची दोन वर्षे प्रशिक्षण कालावधी असतो. या कालावधीतील कामगिरी लक्षात घेता त्यांना सेवेत कायम केले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सर्व सहा अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे.