सलोखा-समन्वय-सुरक्षा अन् सुशासन, नागपूरच्या नवीन आयुक्तांची चतु:सूत्री; पोलिस दलातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

By योगेश पांडे | Published: January 31, 2024 11:51 PM2024-01-31T23:51:51+5:302024-01-31T23:52:02+5:30

शहराला सुरक्षित करण्यावर राहणार भर

Reconciliation-Coordination-Security and Good Governance, the motto of the new Commissioner of Nagpur | सलोखा-समन्वय-सुरक्षा अन् सुशासन, नागपूरच्या नवीन आयुक्तांची चतु:सूत्री; पोलिस दलातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

सलोखा-समन्वय-सुरक्षा अन् सुशासन, नागपूरच्या नवीन आयुक्तांची चतु:सूत्री; पोलिस दलातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

योगेश पांडे

नागपूर : अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी अशी ओळख असणारे नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासमोर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हाने आहेत. नागपुरातील अनेक गंभीर गुन्ह्यांचा वाढलेला गुन्हेदर लक्षात घेता अनेक आघाड्यांवर त्यांना प्रभावी पोलिसिंगवर भर द्यावा लागणार आहे. या अगोदरदेखील नागपुरात कार्यरत राहिलेले सिंगल यांनी नागपुरात आल्यावर सामाजिक सलोखा, समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय, अगदी तळागाळातील नागरिकांपर्यंत सुरक्षिततेची भावना आणि पोलिस विभागाचे सुशासन या चतु:सूत्रीवर भर देण्याचा संकल्प घेतला आहे. गुन्हे नियंत्रणात आणून नागपुरातील नागरिकांमध्ये शहर सुरक्षित असल्याची भावना वाढीस लागावी या दृष्टीने कार्य करणार असल्याचा मनोदय त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

सिंगल ‘गेल’मध्ये इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून कार्यरत होते. १९९६ साली प्रशिक्षणार्थी म्हणून पोलिस दलात रुजू झाल्यानंतर डॉ. सिंगल यांनी विविध पदांवर कार्य केले. प्रभावी पोलिसिंगद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्य करणारे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी मी नागपुरात कार्यभार हाती घेईल. नागपुरातील नेमक्या स्थितीचा मी सर्व समाज घटकांशी चर्चा करून आढावा घेईल. मी नागपुरात होतो तेव्हा स्थिती वेगळी होती. आता गुन्हेगारी व गुन्हेगारांचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे येथील परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक ठरेल. नागरिक आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासोबतच सर्वांना सोबत घेऊन आपण येथे काम करू, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये काम करण्याचा अनुभव

डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाचादेखील अनुभव आहे. कोसोवोमधील यूएन पीस कीपिंग मिशनमध्ये त्यांनी सेवा दिली होती. प्रशासन प्रमुख म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि युद्ध गुन्हे अन्वेषण युनिटच्या प्रमुखपदापर्यंत ते पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली होती.

- देशातील आयर्नमॅन पोलिस अधिकारी

डॉ. सिंगल हे त्यांच्या फिटनेससाठीदेखील ओळखले जातात. २०१८ साली फ्रान्समध्ये (विची) आयोजित आयर्नमॅन ट्रायथलॉनमध्ये ते सहभागी झाले होते. हातात भारतीय ध्वज घेऊन ही कठीण स्पर्धा पूर्ण करणारे पन्नाशीहून अधिक वयोगटातील ते पहिले भारतीय पोलिस अधिकारी ठरले होते. सिंगल हे एक क्राउड मॅनेजमेंट एक्स्पर्ट देखील असून याच क्षेत्रात संशोधन करून त्यांनी डॉक्टरेटदेखील मिळविली आहे. यामुळेच नांदेड येथील गुरू ता गद्दीचा ३०० वा वर्ष सोहळा व नाशिक येथील दोन कुंभमेळ्यांमधील लाखो भक्तांची गर्दी हाताळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. याशिवाय मोटिव्हेशनल स्पीकर, लेखक, सायकलपटू, घोडेस्वार, पिस्तूल आणि रायफल नेमबाज, चित्रकार, छायाचित्रकार अशीदेखील त्यांची ओळख आहे.

- नागपूरच्या नाळेशी परिचित

डॉ. सिंगल हे नागपुरातदेखील कार्यरत होते. मार्च २००९ ते जून २०१० या कालावधीत ते जीआरपी अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत धावत्या रेल्वे गाड्या व प्लॅटफॉर्म्सवर होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणले होते. जून ते डिसेंबर २०१० या कालावधीत ते नागपूरचे अपर पोलिस आयुक्त होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ पर्यंत त्यांच्याकडे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची धुरा होती. हे महत्त्वाचे पद भूषवणारे दुसरे आयपीएस अधिकारी ठरले. तेथे आदिवासी आणि लोकसंस्कृतीच्या विविध स्वरूपांचे संवर्धन, जतन आणि दस्तऐवजीकरण करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती. २०१३ साली प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले होते. नागपुरात इतकी वर्षे सेवा दिल्यामुळे येथील गुन्हे, समस्या यांच्याशी ते परिचित आहेत.

Web Title: Reconciliation-Coordination-Security and Good Governance, the motto of the new Commissioner of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.