अकरा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जबड्याची पुनर्निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 11:17 AM2021-01-22T11:17:56+5:302021-01-22T11:24:37+5:30
Nagpur News डॉक्टरांच्या चमूने तब्बल अकरा तास दीर्घ शस्त्रक्रिया करीत जबडा काढून त्याजागी पायातील हाडापासून पुनर्निर्मित जबडा बसवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दातदुखी व जबड्यात कर्करोगाच्या ट्युमरमुळे ५२ वर्षीय महिलेच्या जबड्याच्या खाली जखम झाली होती, दात हलत होते व तोंडात पस निर्माण झाला होता. त्यामुळे जबडा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. डॉक्टरांच्या चमूने तब्बल अकरा तास दीर्घ शस्त्रक्रिया करीत जबडा काढून त्याजागी पायातील हाडापासून पुनर्निर्मित जबडा बसवला. विशेष म्हणजे, त्याचवेळी दात बसविण्यासाठी आवश्यक असलेले ‘डेंटल इम्प्लांट’देखील बसविले. डॉक्टरांच्या चमूच्या अथक परिश्रमांमुळे अतिशय क्लिष्ट व दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
या रुग्णावर या शस्त्रक्रियेदरम्यान खराब झालेला जबडा शस्त्रक्रिया करून काढून टाकणे, रक्तवाहिन्यांसह पायाचे हाड काढून त्याचा जबडा तयार करणे आणि या जबड्यात कृत्रिम दंतप्रत्यारोपित करण्यासाठी सहा इम्पलांट्स बसविणे; अशा तीन शस्त्रक्रिया मेक्सिलोफेशियल सर्जन डॉ. शाश्वत मगरकर व डॉ. केतकी जोगळेकर, मायक्रोव्हॅस्कुलर रि-कंस्ट्रक्शन प्लास्टिक सर्जन डॉ. शैलेश निसाळ व डॉ. अमोल धोपटे यांनी केले. यांना बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. सचिन डोंगरवार यांची मोलाची साथ मिळाली.
डॉ. मगरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, एरवी, दंतप्रत्यारोपण करण्यासाठी कृत्रिम इम्पलांट्स बसविण्याची शस्त्रक्रिया पहिल्या शस्त्रक्रियेनंतर सहा ते आठ महिन्यांनंतर केली जाते. त्यानंतर सहा ते आठ महिन्यांनी त्यावर दात बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यात येते. जबडा पुनर्निर्माण केल्यानंतर तब्बल १५ ते १८ महिन्यांनी रुग्ण नियमित जेवण करण्यास सज्ज होतो. मात्र, पुनर्निर्मिती शस्त्रक्रियेदरम्यानच केलेल्या ‘डेंटल इम्प्लांट’मुळे रुग्णाला सहा ते आठ महिन्यात दात बसविण्यात येतील. यामुळेच बोलणे, चावणे व गिळणे या क्रिया सहा ते आठ महिन्यातच शक्य होणार आहे. अलीकडच्या काळात ११ तासांत तीन शस्त्रक्रिया झालेले हे पहिलेच प्रकरण असावे.