‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 07:39 PM2022-08-16T19:39:36+5:302022-08-16T19:40:25+5:30
Nagpur News देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्याला स्वतंत्र करावे लागले. अनेक गोष्टींमध्ये देशाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना करावी लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले. आपल्या देशाला मोठे कष्ट व बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची तसेच देशात एकता वृद्धिंगत करण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वातंत्र्यदिन हा आपल्या सर्वांसाठी संकल्पाचा क्षण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्याला स्वतंत्र करावे लागले. अनेक गोष्टींमध्ये देशाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना करावी लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
आपल्या देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देऊ शकतो, तसेच आपल्या प्रगतीत देशाचा विकास होत आहे की नाही, याचा विचार प्रत्येक नागरिकाने करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. याप्रसंगी संघाचे विविध पदाधिकारी, प्रचारक तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.
- स्मृतिमंदिर परिसरातदेखील ध्वजारोहण
डॉ. हेडगेवार स्मारक समितीद्वारे स्मृतिमंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमाला डॉ. मिलिंद भृशुंडी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी महानगर सहसंघचालक व समितीचे उपाध्यक्ष श्रीधर गाडगे तसेच सचिव अभय अग्निहोत्री हेदेखील उपस्थित होते. डॉ. भृशुंडी यांनी त्यांच्या सैन्यकार्यावर यावेळी प्रकाश टाकला.
- विदर्भात १५४ ठिकाणी पथसंचलन
देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विदर्भ प्रांतात एकाच वेळी १५४ तालुकास्थानी व नगर स्थानांवर पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. नागपुरात महानगराच्या घोष पथकातर्फे संघ मुख्यालयातून पथसंचलन काढण्यात आले. संघ कार्यालय, दारोडकर चौक, गांधी पुतळा चौक, गांधीबाग उद्यान, गोळीबार चौक, लाल इमली चौक, भारतमाता चौक, तीननळ चौक, भावसार चौक, चितारओळ चौक, बडकस चौक या मार्गाने संचलन परत संघ मुख्यालयात परतले. संघाच्या अधिकाऱ्यांनी पथसंचालनाचे अवलोकन केले.