लॉकडाऊननंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या ६८८ प्रकरणांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:48+5:302021-03-01T04:08:48+5:30
रियाज अहमद नागपूर : गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावला गेला. त्यांच्यावर ...
रियाज अहमद
नागपूर : गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावला गेला. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. विशेषत: गरीब व मध्यमवर्गीय अधिक प्रभावित झाले. यादरम्यान, नागपूर जिल्ह्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या. जिल्हा महिला व बालकल्याण विभागातील आकडेवारीनुसार, लॉकडाऊननंतर, म्हणजे एप्रिल-२०२० ते जानेवारी-२०२१ पर्यंत कौटुंबिक हिंसाचाराच्या ६८८ प्रकरणांची नोंद झाली.
२०१९-२० या वर्षात कौटुंबिक हिंसाचाराची ७४४ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्या तुलनेत, लॉकडाऊन काळात परिवहनाची साधने उपलब्ध नसताना ६८८ प्रकरणे पुढे आली. ही संख्या केवळ जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडील आहे. याशिवाय इतरही विविध ठिकाणी अशा प्रकरणांची नोंद घेतली जाते. लॉकडाऊनमुळे कौटुंबिक हिंसा वाढली होती असे मानले जाते. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने अशी प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यावर भर दिला. त्यामुळे २०१९-२० या वर्षातील ३०१ प्रकरणांच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये निम्म्यापेक्षा कमी प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. नागपूर, काटोल, रामटेक व उमरेड येथे विभागाचे समुपदेशन केंद्र आहे. या केंद्रांसह थेट कार्यालयात आलेल्या ६८८ पैकी केवळ १३० प्रकरणांतील महिलांनी न्यायालयात धाव घेतली. त्यातील २६ महिलांना दिलासा मिळाला, तर ४२ महिलांना न्यायालयाने समुपदेशनाकरिता पाठविले.
-------------------
एक प्रकरण कोरोनाशी संबंधित
एक प्रकरण कोरोनाशी संबंधित होते. संबंधित महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तिला कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागले. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या मध्यस्थीमुळे हा वाद संपला.