नागपुरातील धुर्वे कुटुंबाच्या विक्रमाची ‘आशिया बुक’मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:07 PM2020-02-11T12:07:02+5:302020-02-11T12:07:26+5:30
लांब पल्ल्याचे सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांनी पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईतील ‘एलिफंटा केव्ह ते गेट वे ऑफ इंडिया’ हे १६ कि. मी. सागरी अंतर अवघ्या ४.५० तासांत पोहून पूर्ण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लांब पल्ल्याचे सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांनी पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईतील ‘एलिफंटा केव्ह ते गेट वे ऑफ इंडिया’ हे १६ कि. मी. सागरी अंतर अवघ्या ४.५० तासांत पोहून पूर्ण केले. गतषर्वी २८ एप्रिल रोजी त्यांनी केलेल्या या विक्रमाची नोंद ‘आशिया बुक’मध्ये झाली. आशिया खंडातील ४८ देशांमध्ये एखाद्या कुटुंबाने प्रथमच अशी कामगिरी केली आहे.
नागपूर पोलीस खात्यात कॉन्स्टेबल असलेले सुखदेव यांनी पत्नी वैशाली, मुलगा सार्थक आणि मुलगी तन्वी यांच्यासोबतीने हा विक्रम केला. आशिया बुकचे प्रमाणपत्र प्राप्त होताच नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी धुर्वे कुटुंबीयांना पोलीस आयुक्तालयात आमंत्रित केले. त्यांना ५० हजारांचा रोख प्रोत्साहनपर पुरस्कार दिला. उपाध्याय यांनी धुर्वे कुटुंबाच्या कर्तृत्वाचा गौरव करीत सुखदेव यांना भविष्यातील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.
अनेक स्पर्धा गाजविणारे सुखदेव यांनी २५ कि.मी. जिब्राल्टर खाडी, धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ कि.मी. सागरी अंतर,रेवास ते गेट वे ऑफ इंडिया हे २५ कि.मी. अंतर आणि मोरा ते गेट वे ऑफ इंडिया हे १९ कि.मी. अंतर विक्रमी वेळेत पोहून पूर्ण केले आहे.या कामगिरीबद्दल त्यांचा सारर्थी पुरस्कार, विदर्भ गौरव, राजा शिवछत्रपती पुरस्कार, बॅरिस्टर शेषराव वानखेडे पुरस्कार आणि वीर बिरसा मुंडा पुरस्काराने गौरव झाला आहे.
त्यांची पत्नी वैशाली या जिल्हा परिषदेत शिक्षिका असून राज्य शालेय क्रीडा जलतरणात १५ पदकांसह आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेतही पदकविजेत्या आहेत. मालवणच्या समुद्रात ३ कि. मी शर्यतही त्यांनी गाजवली. मुलगा सार्थक हा तीनवेळा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णविजेत्या महाराष्ट्र संघाचा जलतरणपटू आहे. सार्थकला १७ आणि १९ वर्षे गटातही सुवर्णपदके मिळाली. ९ वर्षांची तन्वी शहरस्तरावर सुवर्णविजेती जलतरणपटू असून ५०० मीटर अंतराच्या सागरी जलतरणात तिचा नियमित सहभाग असतो. आजच्या सत्कार सोहळयाला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, उपायुक्त विक्रम साळी, मनोज सुतार, नाईक, बेंद्रे, राजेश मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.