आरटीईच्या प्रवेशासाठी चुकीच्या पत्त्यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:07 AM2020-12-08T04:07:52+5:302020-12-08T04:07:52+5:30
रियाज अहमद नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांकडून चुकीचे रहिवासी पत्ते नोंदविले जात आहेत. यासंदर्भात लोकमतला आलेल्या ...
रियाज अहमद
नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांकडून चुकीचे रहिवासी पत्ते नोंदविले जात आहेत. यासंदर्भात लोकमतला आलेल्या तक्रारीवरून काही रहिवासी दाखल्यांची तपासणी केली असता तिथे लाभार्थ्यांचे अस्तित्वच दिसून आले नाही.
आरटीई प्रवेशासाठी नियमानुसार पालकाचे निवासस्थान शाळेपासून १ किलोमीटरच्या आत असणे गरजेचे आहे. पण काही पालक नामांकित शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून शाळेच्यापासून १ किलोमीटरच्या आतील रहिवासी दाखले जोडतात. गेल्यावर्षीपर्यंत हा प्रकार सर्रास सुरू होता. परंतु उच्च न्यायालयाने या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी आरटीई तपासणी समिती गठित केली. या समितीचे सदस्य व आरटीई अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ यांच्याकडे काही पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. लोकमतच्या टीमला ही माहिती मिळाली. टीमने पालकांचे दस्तावेज तपासले व समितीच्या सदस्यांसोबत रहिवासी दाखल्याच्या ठिकाणी भेट दिली. दस्तावेजानुसार एका पालकाने आपला पत्ता सिव्हिल लाईन्स लिहिला होता. परंतु त्या पत्त्यावर कुणीच सापडले नाही. नंतर माहिती झाले की तो पालक गांधीबागमध्ये राहतो. अशाच प्रकारे एका अन्य पालकाने प्रवेशासाठी चिंचभवनचा पत्ता नोंदविला आहे. परंतु या पत्त्यावर भेट दिली असता, एक मोडकळीस आलेली इमारत होती. तिथे कुणाचेही निवासस्थान नव्हते. हा पालक सोनेगाव येथे राहत असल्याचे नंतर माहिती पडले.
न्यायालयापुढे ठेवू प्रकरणे
आरटीई तपासणी समितीचे सदस्य व अॅक्शन कमिटीचे चेअरमन शाहीद शरीफ म्हणाले की, अशा प्रकरणांना आम्ही न्यायालयापुढे ठेवू. ते म्हणाले की, आरटीई प्रवेशासाठी बोगस दाखले तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे गरजवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.