राज्यात विजेच्या मागणीत ‘रेकॉर्ड’ वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:02 AM2018-10-24T01:02:49+5:302018-10-24T01:03:30+5:30
कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समोर गेली आहे. त्यामुळे राज्यात ‘लोडशेडिंग’ कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समोर गेली आहे. त्यामुळे राज्यात ‘लोडशेडिंग’ कायम आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार ‘आॅक्टोबर हिट’मुळे २२ आॅक्टोबर रोजी विजेची मागणी २४ हजार ९६२ मेगावॅटपर्यंत पोहोचली. यात मुंबईतील ३,३८२ मेगावॅटची मागणीदेखील समाविष्ट आहे. मंगळवारीदेखील ही स्थिती कायम होती. सकाळी ११ वाजता २१,३१६ मेगावॅटची मागणी नोंदविण्यात आली. मुंबईसह संपूर्ण राज्यात १६ आॅक्टोबर रोजी २४,९२२ मेगावॅट, १७ तारखेला २४,६८७ मेगावॅटची मागणी नोंदविल्या गेली. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात २१,५८० मेगावॅट विजेची आवश्यकता होती. यातुलनेत महावितरणकडे केवळ २०,६३० मेगावॅट वीज उपलब्ध होती. यामुळे अधिक वीजहानीच्या ग्रुप ‘जी-१’, ‘जी-२’ आणि ‘जी-३’ येथे एकूण ९५० मेगावॅटची ‘लोडशेडिंग’ करावी लागली, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
राज्यात कमी पावसामुळे सिंचनासाठी कृषिपंपांचा वापर वाढला आहे. तसेच आॅक्टोबरमध्ये तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. त्यामुळे विजेची मागणी वेगाने वाढत आहे. दुसरीकडे राज्यात औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रांमधील तीन युनिट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद आहेत.
पुरवठ्याला फटका
विजेच्या वाढत्या मागणीत महावितरणला खुल्या बाजारातून महागड्या दरात ३,६५२ मेगावॅट वीज खरेदी करावी लागत आहे. महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या प्रत्येक स्रोतातून कमी वीज मिळत आहेत. ‘पॉवर एक्सचेंज’मधून राज्याला मिळालेल्या ३ हजार मेगावॅट आणि बँकमधून मिळणाºया १८८ मेगावॅटने काही प्रमाणात दिलासा दिला आहे.