सर्वात मोठ्या राखीचा विक्रम
By admin | Published: August 30, 2015 02:56 AM2015-08-30T02:56:47+5:302015-08-30T02:56:47+5:30
मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर सांगितले की, सर्व नागरिक आपापल्या धर्माला श्रेष्ठ म्हणतात.
नागपूर : मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर सांगितले की, सर्व नागरिक आपापल्या धर्माला श्रेष्ठ म्हणतात. परंतु प्रत्यक्षात मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. रक्षाबंधनाचा सण मैत्री आणि मानवतेचा संदेश देतो. रक्षाबंधनानिमित्त आज जगातील सर्वात मोठी ७२१ फुटांची राखी अंतर्मना मुनिश्री प्रसन्नसागरजी यांना समर्पित करण्यात आली.
पावन वर्षायोग समितीच्यावतीने या भव्य राखीचा समर्पण समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला. यात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. या राखीची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली आहे. ही नोंद घेणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांसमोर या बाबीची पुष्टी केली आहे. मुनिश्रींच्या चातुर्मासाचे विशेष आकर्षण ठरलेल्या या ७२१ फूट लांबीच्या राखीची नागरिकांनी उत्सुकतेने पाहणी केली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर आचार्यश्री पूणचंद्र सुरीश्वरजी महाराज, मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज, मुनिश्री पीयूषसागरजी महाराज, मुनिश्री गिरनारसागरजी महाराज, मुनिश्री प्रज्ञासागरजी महाराज, संस्कार सागरजी महाराज आणि क्षुल्लकजी उपस्थित होते.
कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, नासुप्रचे सभापती शाम वर्धने, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक प्रशांत धवड उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ राखीचे सौभाग्यशाली श्रावक स्वरुपाबेन अमरचंद मेहता आणि मनीष मेहता परिवाराच्या हस्ते ध्वजारोहण करून झाला. यावेळी चातुर्मास समितीचे अध्यक्ष नरेश पाटणी, कार्याध्यक्ष राकेश पाटणी, संयोजक प्रकाश बोहरा, महामंत्री पंकज बोहरा, संतोष पेंढारी, सतीश पेंढारी, सुनील पेंढारी, अमित बडजाते, राजेश सरावगी, नितीन महाजन उपस्थित होते. भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. (प्रतिनिधी)