पूर्व विदर्भात डेंग्यूची विक्रमी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:08 AM2021-09-03T04:08:14+5:302021-09-03T04:08:14+5:30

नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालल्याने चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत या ...

Record record of dengue in East Vidarbha | पूर्व विदर्भात डेंग्यूची विक्रमी नोंद

पूर्व विदर्भात डेंग्यूची विक्रमी नोंद

Next

नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालल्याने चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत या वर्षी विक्रमी वाढ झाली. धक्कादायक म्हणजे, २०२० च्या तुलनेत या आठ महिन्यात ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९ वर पोहचली आहे.

पूर्व विदर्भाला डेंग्यूने घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. ताप कमी झाल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने गंभीर रुग्णांची संख्याही वाढली आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून २०१८ मध्ये ११९० रुग्ण, ११ मृत्यू, २०१९ मध्ये १३१६ रुग्ण, ११ मृत्यू, २०२० मध्ये ५०३ रुग्ण, २ मृत्यू तर ऑगस्ट २०२१ पर्यंत २,२०७ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. पाऊस लांबल्यास सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यातही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याच्या तुलनेत या वर्षी नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप दिसून येत आहे. २०१९ मध्ये ७४१, २०२० मध्ये १६१ तर ऑगस्ट २०२१ पर्यंत १४०७ रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात २०१९ मध्ये ४६५, २०२० मध्ये २०४ तर २०२१ मध्ये ३६० रुग्ण आढळून आले. गोंदिया जिल्ह्यात २०१९ मध्ये ३७, २०२० मध्ये ४ तर या वर्षी १२१, भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये १०, २०२० मध्ये ८ तर २०२१ मध्ये ३६ तर गडचिरोली जिल्ह्यात २०१९ मध्ये ११, २०२० मध्ये १६ तर २०२१ मध्ये २५ रुग्णांची नोंद झाली.

-ऑगस्ट महिना ठरला धोकादायक

ऑगस्ट महिन्यात सहाही जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचा धोका वाढताना दिसून आला. नागपूर ग्रामीणमध्ये ७९०, तर शहरात ६१७, भंडारा जिल्ह्यात ३६, गोंदिया जिल्ह्यात १२१, चंद्रपूर ग्रामीणमध्ये १९३, तर शहरात १६७, गडचिरोली जिल्ह्यात २५, तर वर्धा जिल्ह्यात २५८ रुग्ण आढळून आले.

-डेंग्यूची जबाबदारी प्रत्येकाची

डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. घरात व परिसरात पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. दिवसाही झोपताना मच्छरदाणीचा वापर करायला हवा. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे. डेंग्यूचा डास हा साधारण सकाळी व सायंकाळी चावतो. यामुळे या वेळेत विशेष काळजी घ्यावी. कुठलेही लक्षणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. श्याम निमगडे, सहायक संचालक (हिवताप) आरोग्य सेवा नागपूर

:: सहा जिल्ह्यातील डेंग्यूची आकडेवारी

वर्ष डेंग्यू रुग्ण मृत्यू

२०१८ ११९० ११

२०१९ १३१६ ११

२०२० ५०३ ०२

२०२१ २२०७ ०९

ऑगस्ट महिन्यातील स्थिती

जिल्हा : रुग्ण : मृत्यू

नागपूर (ग्रामीण): ७९० : ०३

शहर: ६१७ : ०३

भंडारा : ३६ : ०१

गोंदिया: १२१ :००

चंद्रपूर (ग्रामीण): १९३ : ०१

शहर: १६७ : ००

गडचिरोली : २५ :००

वर्धा : २५८ : ०१

Web Title: Record record of dengue in East Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.