रेकॉर्डब्रेक! ७,४५० रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:08+5:302021-05-14T04:09:08+5:30
उमरेड : देशासह जागतिक बाजारपेठेत सोयाबीनची वाढलेली मागणी आणि कमी उत्पादन यामुळे यंदा कधी नव्हे ते सोयाबीनला सुगीचे दिवस ...
उमरेड : देशासह जागतिक बाजारपेठेत सोयाबीनची वाढलेली मागणी आणि कमी उत्पादन यामुळे यंदा कधी नव्हे ते सोयाबीनला सुगीचे दिवस आले आहेत. उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कधी नव्हे तो सोयाबीनला रेकॉर्डब्रेक ७,४५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सुरुवातीलाच ३,५०० रुपयांपासून सुरू झालेला हा भाव आता सात हजार पार झाला. असे असले तरी मोजक्याच शेतकऱ्यांजवळ उरलेसुरले सोयाबीन आहे. बहुतांश माल व्यापाऱ्यांकडे असल्याने या रेकॉर्डब्रेक दराचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होणार आहे. यंदाचा खरेदीचा हंगाम ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाला. आतापर्यंत उमरेड बाजार समितीमध्ये २ लाख ४ हजार ६४३ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले. मागील काही वर्षांपासून सोयाबीनला फारसा भाव नव्हता. मागील वर्षी ४ हजारांपलीकडे दर सरकले नाही. मागील वर्षी १ लाख ९५ हजार १६ क्विंटल सोयाबीन बाजार समितीमध्ये आले. सर्वाधिक भाव ३,७०० रुपये मिळाला. यावर्षी सोयाबीनची आधारभूत खरेदी किंमत ३,८१० रुपये होती.
---
हरभऱ्याचे दर समाधानकारक
यंदा हरभऱ्यालाही समाधानकारक दर मिळाले. फेब्रुवारीपासून बाजारात आवक सुरू झाल्यानंतर आतापर्यंत उमरेड बाजार समितीमध्ये २ लाख ३५ हजार ८१३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. हरभऱ्यालाही ५ हजार रुपयांच्या आसपास भाव मिळाला. मागीलवर्षी ९१,४५३ क्विंटल हरभरा बाजार समितीमध्ये आला. त्यावेळी ४,५०० रुपयांच्या आसपास भाव मिळाला.
शासकीय केंद्राकडे पाठ
यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ दाखविली. सोयाबीन आणि हरभरा या दोन्ही शेतमालाच्या आधारभूत किमतीत आणि खुल्या बाजारातील किमतीमध्ये फारशी तफावत नसल्याने हे घडले, ही बाब स्पष्ट आहे. उमरेड विकास खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून शासकीय खरेदी केंद्र सेवा देत असते. यावर्षी केवळ २२९ शेतकऱ्यांचा ३,२०० क्विंटल हरभरा या केंद्रात आला. मागील वर्षी या केंद्रावर १६,५०० क्विंटल हरभरा आला होता. हरभऱ्याला हमी भाव ४,८७५ रुपये मिळाला. शिवाय खुल्या बाजारातील दरात ५,०० रुपयांच्या आसपास तफावत होती. अधिकांश सोयाबीन उत्पादकांनीसुद्धा खुल्या बाजारपेठेतच माल विकला.