कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:02+5:302021-03-23T04:09:02+5:30

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मृत्यूची संख्याही उंचावत चालल्याने चिंता अधिक वाढली आहे. सोमवारी ४० मृत्यूची ...

Recorded the highest death toll in the second wave of corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

Next

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मृत्यूची संख्याही उंचावत चालल्याने चिंता अधिक वाढली आहे. सोमवारी ४० मृत्यूची नोंद झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील मृत्यूचा हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, तीन दिवसांत १०१ रुग्णांचे जीव गेले. मृतांची एकूण संख्या ४,६६४ झाली आहे. शिवाय, मागील सहा दिवसांपासून दैनंदिन रुग्णांची संख्या ३ हजारांवर जात आहे. सोमवारी ३५९६ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या १,९६,६७६ वर पोहचली. रुग्णाचा दर १.८२ टक्के तर, मृत्यूचा दर २.३७ टक्के आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद १७ सप्टेंबर रोजी झाली. या दिवशी ६४ रुग्णांचे मृत्यू झाले होते. ११ ऑक्टोबर रोजी ३६ रुग्णांचे बळी गेले होते. त्यानंतर मृत्यूची संख्या कमी होऊ लागली होती. जानेवारी महिन्यात शहर व ग्रामीण भागात दैनंदिन मृत्यूची संख्या अनेकदा शून्यावर आली होती. परंतु आता पुन्हा मृत्यूची संख्या वाढताना दिसून येत असल्याने धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे, १५ मार्चपर्यंत दैनंदिन मृत्यूची संख्या १५च्या खाली होती. परंतु १६ मार्चपासून मृत्यूची संख्या वाढत गेली. या दिवशी १८ मृत्यूची नोंद झाली. नंतर १७ मार्च रोजी १६, १८ मार्च रोजी २३, १९ मार्च रोजी ३५, २० मार्च रोजी २९, २१ मार्च रोजी ३२ तर २२ मार्च रोजी सर्वाधिक ४० मृत्यू नोंदविण्यात आले.

-शहरात २,६२५, ग्रामीणमध्ये ९६७ पॉझिटिव्ह

शहरासोबतच आता ग्रामीण भागातही रुग्ण व मृत्यूची संख्या वाढत आहे. शहरात २,६२५ तर ग्रामीणमध्ये ९६७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. मृतांमध्ये शहरात २१, ग्रामीणमध्ये १५ रुग्णांचे बळी गेले. जिल्ह्याबाहेर ४ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली. शहरात रुग्णांची एकूण संख्या १,५६,४४८ तर मृतांची संख्या २,९८७ झाली. ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या ३९,२२४ झाली असून मृत्यूची संख्या ८५५ वर पोहचली आहे. जिल्ह्यात आज १८३७ रुग्ण बरे झाले.

-चाचण्यांमध्ये घट

नागपूर जिल्ह्यात सलग सात दिवसांपासून दैनंदिन चाचण्यांची संख्या १५ ते १७ हजार दरम्यान जात होती. परंतु सोमवारी यात घट आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १२,६२३ चाचण्या झाल्या. यात १०,६०० आरटीपीसीआर तर २०२३ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ३,४२० तर ॲन्टिजेनमधून १७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

-खाट मिळविण्यासाठी रुग्णांची धावाधाव

जिल्ह्यात कोरोनाचे ३१,०६७ रुग्ण सक्रिय आहेत. यातील गृह विलगीकरणात २३,६७२ तर ७,३९५ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. मेडिकलमध्ये ४२३ तर मेयोमध्ये ४२५ रुग्ण उपचाराखाली आहेत. मेडिकलमध्ये सध्यातरी ५१० खाटा आहेत. त्या फुल्ल झाल्याचे सांगून रुग्णांना परत पाठविले जात आहे. मेयोमध्ये २०० खाटा रिकाम्या आहेत. परंतु तिथे मनुष्यबळ नाही. रुग्णालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मनुष्यबळाची मागणी केली आहे. एम्समध्ये मागील दोन आठवड्यांपासून खाटा फुल्ल आहेत. मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्येही खाटा नसल्याचे कारण दिले जात आहे. परिणामी, रुग्णांवर खाट मिळविण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली

-मागील सहा दिवसांत असे वाढले मृत्यू

१७ मार्च : १६ मृत्यू

१८ मार्च : २३ मृत्यू

१९ मार्च : ३५ मृत्यू

२० मार्च : २९ मृत्यू

२१ मार्च : ३२ मृत्यू

२२ मार्च : ४० मृत्यू

कोरोनाची स्थिती

दैनिक चाचण्या: १२,६२३

ए. बाधित रुग्ण :१,९६,६७६

सक्रिय रुग्ण : ३१,०६७

बरे झालेले रुग्ण :१,६०,९४५

ए. मृत्यू : ४,६६४

Web Title: Recorded the highest death toll in the second wave of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.