मान्यता नसतानाही वसुली जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:30+5:302020-12-15T04:25:30+5:30
नागपूर : नारायणा ई-टेक्नो स्कूलला मान्यता नसतानाही, पालकांकडून लाखो रुपये फी वसूल करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली. ...
नागपूर : नारायणा ई-टेक्नो स्कूलला मान्यता नसतानाही, पालकांकडून लाखो रुपये फी वसूल करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली. विशेष म्हणजे प्रवेशापूर्वी शाळेने जी आश्वासने दिली होती त्या कुठल्याही आश्वासनांची पूर्तता केली नाही, अशी ओरड पालकांची होती. लोकमतने सलग दोन दिवसांपासून शाळेचा बोगसपणा उघडकीस आणल्यानंतर सोमवारी सकाळपासून पालक शाळेत धडकले. शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाचे अधिकारी पालकांचे समाधान करू शकले नाहीत. येणारा प्रत्येक पालक टीसीसाठी तगादा लावत होता.
नारायणा ई-टेक्नो ही शाळा नर्सरी ते सातव्या वर्गापर्यंत आहे. गेल्यावर्षी ४५ हजारापासून ७५ हजारापर्यंत शाळेने पालकांकडून शैक्षणिक शुल्क आकारले आहे. प्रवेशापूर्वी शाळा व्यवस्थापनाने पालकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शाळेच्या फी बरोबरच गणवेश, पुस्तके, शाळेत होणारे कार्यक्रम, शाळेची निघणारी ट्रिप, स्कूलबसचा खर्च या माध्यमातून पालकांकडून लाख रुपयांपर्यंत वसुली केली आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर शाळेने ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू केले. फी सुद्धा १० ते २० टक्क्यांनी वाढविली. काही पालकांनी फी वाढविल्यामुळे शाळेतून मुलांना काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी टीसीची मागणी केली. पण शाळेकडे मान्यताच नसल्याने टीसी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. ज्या पालकांनी खंबीर भूमिका घेतली, त्यांना टीसी दिली मात्र तीसुद्धा दुसऱ्याच शाळेची. लोकमतच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून शाळेचा बोगसपणा उघडकीस आणला जात आहे. शाळेच्या बोगसपणामुळे पालकांमध्ये मुलांच्या भविष्यासंदर्भात भीती निर्माण झाली आहे. सोमवारी अनेक पालक शाळेत धडकले. अनेकांनी कोरोना काळात भरलेली फी परत करण्याची मागणी केली. काही पालकांनी टीसीसाठी शाळेकडे तगादा लावला. शाळेने आमची फसवणूक केल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. शाळेची मान्यता नसतानाही शाळा सुरू करून लाखो रुपये वसूल केल्याबद्दल पालक संतप्त झाले होते. अनेकांनी मुलांचे पुढे काय होणार, अशी चिंता व्यक्त केली.
- प्रवेश घेण्यापूर्वी शाळेने जी काही आश्वासने दिली होती, ती कुठलीही आश्वासने शाळेने पाळली नाही. मान्यता नसतानाही ६० हजार रुपये पहिल्या वर्गासाठी घेतले. गणवेश आणि पुस्तकांचे १२,५०० घेतले. एकप्रकारे शाळेने पालकांकडून पैसेच लुटले. आज शाळेचा हा बोगसपणा उजेडात आला आहे. आमच्या मुलांचे नुकसान शाळेने केले आहे.
रोशन येवले, पालक
- माझ्या मुलाची शैक्षणिक प्रगती समाधानकारक नव्हती. त्यातच फी वाढतच होती. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्यानंतरही ऑनलाईनच्या नावाखाली फी वसूल केली आणि तीसुद्धा १० टक्के जास्त. त्यामळे मी टीसीसाठी अर्ज केला होता. अजूनही टीसी मिळाली नाही. आता जी टीसी देत आहे, ती कुठल्यातरी शाळेची आहे. हा पूर्ण बोगसपणा आहे. शिक्षण विभागाने यांच्यावर कारवाई करावी.
अजित द्विवेदी, पालक
- शाळेने पैशासाठी तर हैराण करून सोडले. एकतर ज्या सोयी सुविधा देणार असे त्यांनी सांगितले होते त्या कुठल्याही सुविधा त्यांनी दिल्या नाहीत. प्रत्येक कार्यक्रमासाठी फक्त पैशाची वसुली करीत होते. पालक मुलांच्या भविष्यासाठी तडजोड करून फी भरत होते. पण या शाळेला मान्यताच नाही, हे कळल्यावर शिक्षणाच्या नावावर संस्था कशा फसवणूक करतात हे लक्षात आले.
पराग मार्गनवार, पालक