नागपुरात एन्ट्री च्या नावाने खंडणी वसुली : आयजींच्या स्टेनोकडून उकळली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:18 AM2019-11-06T00:18:28+5:302019-11-06T00:19:37+5:30
पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातील लघुलेखकाकडून (स्टेनो) एन्ट्री फीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या तीनपैकी दोन भामट्यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातील लघुलेखकाकडून (स्टेनो) एन्ट्री फीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या तीनपैकी दोन भामट्यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. पवन रमेश शेरेकर (वय २९), राहुल शंकरराव गवई (वय २७), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर, त्यांचा सौरव मडावी नामक साथीदार फरार आहे.
भक्तिमंदिर, कुंभारवाडा (अमरावती) येथील रहिवासी नितीन रामदास नांदूरकर (वय ४५) विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात लघुलेखक (स्टेनो) आहेत. ते मुळचे अमरावतीचे रहिवासी असून गेल्या वर्षभरापासून ते अमरावती-नागपूर जाणे येणे करतात. शनिवारी दुपारी काम आटोपल्यानंतर नांदूरकर आणि त्यांचा मित्र सतीश चव्हाण दुपारी ४.१५ वाजता त्यांच्या स्वीफ्ट कार(एमएच २७/ डीई २०११)ने नागपूरहून अमरावतीकडे जायला निघाले. भरतवाडा बसथांब्याजवळ आरोपी शेरेकर, गवई आणि मडावीने त्यांची कार अडवली. येथून पुढे जाण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील, असे आरोपी म्हणाले. १०० रुपये दिले नाही तर तुम्ही येथून कार घेऊन पुढे जाऊ शकत नाही, असे आरोपी म्हणाले. नांदूरकरने स्वत:चा परिचय देताच शेरेकर आणि साथीदाराने त्यांना धमकी दिली. एवढेच नव्हे तर आरोपींनी सतीश चव्हाण यांच्या खिशातून एन्ट्रीच्या नावाखाली खंडणीसारखे १०० रुपये जबरदस्तीने वसूल केले. नांदूरकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून खंडणी वसुलीची माहिती दिली. त्यानंतर अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाºयाच्या कार्यालयातील कर्मचाºयाशी संबंधित असल्यामुळे अंबाझरी पोलिसांनी धावपळ करून घटनास्थळ परिसरातील दुकानदारांकडे विचारणा केली. या भागातील कुख्यात गुंड शेरेकर नेहमीच या भागात छोट्याछोट्या दुकानदारांकडून, वाहनचालकांकडून खंडणी वसुली करीत असतो, अशी माहिती पुढे आली. त्याची या भागात प्रचंड दहशत असल्याने कुणी वाच्यता करीत नाहीत. दरम्यान, पोलिसांनी धावपळ करून रविवारी आरोपी शेरेकर आणि गवईला अटक केली. तिसरा आरोपी मडावी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आरटीओचा अविर्भाव !
विशेष म्हणजे, महामार्गावर रात्रीच्या ठिकाणी आरटीओतील दलाल कारवाईचा धाक दाखवून एन्ट्रीच्या नावाखाली खंडणी वसूल करतात. त्यांनी वाहनचालकांकडून रक्कम गोळा करण्यासाठी रोजंदारीवर गुंडांच्या टोळ्या ठेवल्या आहेत. त्यापैकीच काही गुंड सर्रासपणे वाहनचालकांकडून एन्ट्रीच्या नावाखाली खंडणी उकळतात.