१२ हजार पोलिसांची भरतीप्रक्रिया लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:16 AM2021-01-13T04:16:15+5:302021-01-13T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलीस भरतीत आता कुठलाही अडसर नाही. १२ हजार पोलिसांची भरतिप्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस भरतीत आता कुठलाही अडसर नाही. १२ हजार पोलिसांची भरतिप्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. ५,५०० जागांची भरती येत्या आठ दिवसांत आणि नंतर ७,५०० व नंतर ५००० जागांची भरती अशी टप्प्याटप्प्याने तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले. त्यामुळे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पोलीस विभागात लाखो पदे रिक्त असताना पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत नसल्यामुळे अनेक पात्र उमेदवारांच्या वयात वाढ होऊन ते रोजगाराच्या संधीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता पोलीस दलातील १२ हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सोमवारी सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु, आंदोलकांना प्रशासनाने आकाशवाणी चौकात जाण्यास सांगितले.
दरम्यान, गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवासस्थानी आमंत्रित केले. चर्चेमध्ये महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह आमदार विकास ठाकरे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.