अजबच! उत्तरपत्रिका रिकामी, पण ‘पेन’मुळे उमेदवार पास
By योगेश पांडे | Published: April 21, 2023 11:42 AM2023-04-21T11:42:17+5:302023-04-21T11:43:43+5:30
कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदभरतीत मोठा ‘गोलमाल’ : अधिकारी ‘सीबीआय’च्या रडारवर
योगेश पांडे
नागपूर : कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदभरतीत पैसे घेऊन नियुक्तिपत्र देण्याच्या रॅकेटचा ‘सीबीआय’ने भांडाफोड केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या या बोर्डाच्या भरतीप्रक्रियेत सुरुवातीपासूनच सावळागोंधळ होता. जानेवारी महिन्यात झालेल्या लेखी परीक्षेच्या अगोदरच रॅकेटची सुरुवात झाली होती. अनेक उमेदवारांनी त्यांच्या ‘ओएमआर शीट’वर (उत्तरपत्रिका) एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत लागली. या सर्वामागे त्यांनी वापरलेल्या ‘पेन’चीच ‘लिंक’ असून, त्याचाच उपयोग करत रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनीच उत्तरे ‘शीट’वर भरली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
‘सीबीआय’च्या छाप्यांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाची ‘सीबीआय’ला विश्वासू खबऱ्यांकडून ‘टीप’ मिळाली. तसेच भरती प्रक्रियेत सुरुवातीपासूनच कसे काय रॅकेट सुरू आहे, याची इत्यंभूत माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी सफाई कर्मचारी, सहायक शिक्षक व माळी पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती.
नियोजित वेळापत्रकानुसार १ जानेवारी रोजी लेखी परीक्षा होणार होती. मात्र ती परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आली व १४ जानेवारी रोजी परीक्षा झाली. परीक्षा होण्याअगोदरच सूत्रे हलण्यास सुरुवात झाली होती. रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांनी अज्ञात अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी संपर्क केला व ‘डील’ निश्चित केली. लेखी परीक्षेच्या वेळी केवळ ‘ओएमआर शीट’वरील नाव, परीक्षा क्रमांक, पदाचे नाव इत्यादी जुजबी आवश्यक माहितीच भरण्याची सूचना त्यांना करण्यात आली. एकाही प्रश्नाच्या उत्तरासमोर खूण करायची नाही, असे बजावण्यात आले. त्यानुसार काही उमेदवारांनी उत्तरपत्रिका रिकाम्याच ठेवल्या.
परीक्षा झाल्यावर त्यांच्याकडून त्यांनीच वापरलेले ‘पेन’ घेण्यात आले व संबंधितांच्या उत्तरपत्रिकेत रॅकेटमधील अज्ञात आरोपींकडून बरोबर उत्तरांसमोर खूण करण्यात आली. जर वेगळ्या पेनाने या खूणा झाल्या असत्या तर चौकशीचा फेरा लागण्याची शक्यता होती. त्यामुळेच ‘पेन’ची ही ‘लिंक’ आरोपींनी शोधून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हिशेब ठेवायला नेमावी लागली शिक्षिका
सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये अनेक जण सहभागी असल्याची शक्यता आहे. आरोपी चंद्रशेखर लांजेवार या प्रकरणात मोठ्या भूमिकेत होता. तोदेखील या प्रकरणात एक मोहराच होता. लांजेवारला पैशांचा हिशेब ठेवण्यासाठी एक शिक्षिका नेमावी लागली. तिच्याकडेच कुणाला किती पैसे दिले, याचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी होती. यातूनच या प्रकरणाची मुळे खोलवर रूजली असल्याचे दिसून येत आहे.
‘सिव्हीलिअन स्टाफ’वर चौकशीचा रोख
या प्रकरणात संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सीबीआयने केलेल्या कारवाईचा रोख कॅन्टोन्मेंटमधील ‘सिव्हिलिअन स्टाफ’वर आहे. यात सैन्यदलातील किंवा सेवेतील कुठलाही अधिकारी वा कर्मचारी सहभागी नसल्याचा दावा करण्यात आला आहे.