नागपुरातील माफसूच्या पदभरतीत गोलमाल असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 09:01 PM2018-01-17T21:01:32+5:302018-01-17T21:12:28+5:30
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.
गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र (वाईल्ड लाईफ रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटर) स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात एकूण २० जागाही मंजूर करण्यात आल्या. यापैकी पशु वैद्यकीय चिकित्सालयीन औषधशास्त्र, पशु प्रजनन शास्त्र आणि पशु जैव तंत्रज्ञान या पदासाठी जाहिरात काढण्यात आली. ही तिन्ही पदे पशु व मत्स्य विद्यापीठाशी संबंधित आहेत. वाईल्ड लाईफशी त्यांचा संबंध नाही. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी वन्यजीव विज्ञान किंवा वन्यजीव आरोग्य व व्यवस्थापन या विषयाच्या पदव्युत्तरांची आवश्यकता आहे. परंतु हे विषय जाहिरातीतूनच वगळण्यात आले आहेत. यासंबंधात काही जणांनी तक्रारही केली आहे. डॉ. दत्तात्रय इंगोले हे स्वत: एक उमेदवार आहेत. ते मूळचे उस्मानाबाद येथील रहिवासी असून सध्या धुळ्याला राहतात. ते माफसूचेच माजी विद्यार्थी असून वाईल्ड लाईफचे तज्ज्ञ आहेत. वन्यजीव सायन्समध्ये ते पीएचडी आहेत. तसेच नेटसुद्धा झालेले आहेत. वाईल्ड लाईफ सेंटरसाठी पदभरती होत आहे. परंतु या विषयातील तज्ज्ञ असूनही अर्ज करता येत नसल्याने त्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवून याबाबत आक्षेप घेतला आणि अर्ज करण्याची विनंती केली. विद्यापीठाने त्यांची विनंती मान्य केली. मुलाखतीसाठीही त्यांना बोलावले. बुधवारी मुलाखत होती. परंतु त्यांची मुलाखतच घेण्यात आली नाही. याबाबत विचारणा केली असता कुणी काहीही बोलायला तयार नव्हते. मुलाखत न घेताच त्यांना परत पाठविण्यात आले. मुलाखत घ्यायचीच नव्हती तर मग कॉल लेटर पाठवलेच का, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.