‘भारांकन’ पदभरतीचा घोळात घोळ

By admin | Published: May 23, 2017 02:11 AM2017-05-23T02:11:54+5:302017-05-23T02:11:54+5:30

कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त पदभरतीसाठी सध्या ‘भारांकन’ पद्घतीने पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे.

In the recruitment of 'weighting' post-mortem | ‘भारांकन’ पदभरतीचा घोळात घोळ

‘भारांकन’ पदभरतीचा घोळात घोळ

Next

कृषी सेवक पदभरती : विभागात १३८ पदे रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त पदभरतीसाठी सध्या ‘भारांकन’ पद्घतीने पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र या अतिशय क्लिष्ट पद्घतीमुळे पुन्हा घोळात घोळ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष म्हणजे, राज्य शासनाने कृषी विभागातील या रिक्त पदभरतीसाठी मागील २९ डिसेंबर २०१५ रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ६ आॅगस्ट २०१६ रोजी लेखी परीक्षा घेऊन, ६ सप्टेंबर २०१६ रोजी उमेदवारांची निवड यादी जाहीर केली होती. परंतु त्या निवड यादीत अनियमितता झाल्याने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर मागील वर्षभरापासून संपूर्ण निवड प्रक्रिया थंडबस्त्यात पडली होती. परंतु अलीकडेच राज्य शासनाने ती रखडलेली कृषी सेवकांची पदभरती थेट ‘भारांकन’ पद्घतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रक्रिया सुरू केली. यात लेखी परीक्षेसाठी कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या पात्र कृषी पदविका व कृषी पदवीधारक उमेदवारांमधून ही निवड केली जाणार आहे. मात्र त्यासाठी कृषी विभागाला सर्व उमेदवारांच्या अर्जांमधून सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करायची आहे. ते काम कृषी विभागासाठी चांगलेच डोकेदुखी बनले आहे.
या भारांकन पद्घतीत उमेदवारांच्या पदविका किंवा पदवीतील गुणांच्या आधारे निवड करायची आहे. नागपूर विभागात एकूण १३८ पदे असून, त्यासाठी १३ हजार ४८६ उमेदवारांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केलेले आहेत.
मात्र कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या बऱ्याच उमेदवारांच्या आॅनलाईन अर्जात इयत्ता दहावी, कृषी पदविका व कृषी पदवीची टक्केवारी नमूद केलेली नाही, शिवाय काहींनी चुकीची टक्केवारी दिली आहे.
उमेदवारांच्या अर्जातील या त्रुटी दूर करण्यासाठी कृषी विभागातर्फे मागील २३ एप्रिलपासून आतापर्यंत तीन शिबिर घेण्यात आले आहे. मात्र तरीही अजूनपर्यंत ९०० पेक्षा अधिक उमेदवारांच्या अर्जात त्रुटी शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कृषी पदवीधारकांवर अन्याय का?
जाणकारांच्या मते, या ‘भारांकन’ पद्घतीत केवळ पदविका आणि पदवीतील गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे, त्यामुळे लेखी परीक्षेतील गुणांचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय अनेक उमेदवारांनी कृषी पदविका अभ्यासक्रम हा खासगी महाविद्यालयांमधून पूर्ण केलेला आहे. त्यामुळे त्यांना निश्चितच कृषी पदवीधारक उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळाले आहे. त्यामुळे या ‘भारांकन’ पद्घतीत अधिक परिश्रम करून कृषी पदवी प्राप्त करणाऱ्या हुशार उमेदवारांऐवजी खासगी महाविद्यालयातून पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड होण्याची अधिक शक्यता आहे. कृषी विभागाकडे प्राप्त अर्जामध्ये बहुतांश उमेदवार पदविकाधारक असून, त्यांचे गुण पदवीधारक उमेदवारांपेक्षा फार अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही ‘भारांकन’ निवड पुन्हा एका नव्या वादात अडकणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: In the recruitment of 'weighting' post-mortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.