१५ वर्षांनंतर मनपात होणार पदभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:42+5:302021-09-09T04:11:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेत ११,५२२ पदे मंजूर आहेत. यातील ७२६५ पदे कार्यरत असून, ४४५८ पदे रिक्त असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत ११,५२२ पदे मंजूर आहेत. यातील ७२६५ पदे कार्यरत असून, ४४५८ पदे रिक्त असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे, तर १५ वर्षांनंतर सत्ता पक्षाला रिक्त पदांची आठवण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मनपात ७५ वॉर्ड असताना १२ हजार कर्मचारी होते. आज शहराची लोकसंख्या दुपटीहून अधिक झाली. नगरसेवकांची संख्या १५१ झाली. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची पदे न वाढता कमी झाली. याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी सत्ताधारी पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी बुधवारी मनपा सभागृहात स्थगन प्रस्तावातून केली.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला; परंतु मागील १५ वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेत कंत्राट पध्दती आली. यात कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याचा आरोपही केला. बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी राज्यात भाजपची सत्ता असताना पदभरती का केली नाही, असा सवाल केला.
लोकसंख्या १२ लाख असताना मनपात १२ हजार कर्मचारी होते. आज २४ लाखांहून अधिक लोकसंख्या असताना ७२६५ कर्मचारी आहेत. मालमत्ता, बाजार विभागात ५० टक्के पदे रिक्त आहेत. ४३ उद्यानांची देखभाल करण्यासाठी मजूर नाही. अग्निशमन विभागात ७०७ पदे रिक्त असल्याचे अविनाश ठाकरे यांनी निदर्शनास आणले. मागासवर्ग कक्षाकडून रोष्ठरला मंजुरी मिळालेली नाही. शासन निर्देशानुसार पदभरती बंद असल्याचे उपायुक्त निर्भय जैन यांनी निदर्शनास आणून दिले.
...
पदभरतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवा
मनपातील ४४५८ पदे रिक्त असल्याने करवसुलीवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने विविध विभागात भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. मनपातील रिक्त पदभरतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.
...
मनपातील मंजूर पदे- ११,५२२
कार्यरत पदे -७२६५
रिक्त पदे -४४५८
अग्निशमन विभागात मंजूर पदे -८७३
अग्निशमनध्ये रिक्त पदे -७०७