वारांगनांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी ‘रेडक्रॉस'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:37 PM2018-05-07T23:37:46+5:302018-05-07T23:51:41+5:30
वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम करीत त्यांना मदतीचा हात देत सन्मानाने जीवन जगण्याचा, आशेचा किरण फुलवणाऱ्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा गेल्या सहा दशकांपासून सेवाधर्म अविरत सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम करीत त्यांना मदतीचा हात देत सन्मानाने जीवन जगण्याचा, आशेचा किरण फुलवणाऱ्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा गेल्या सहा दशकांपासून सेवाधर्म अविरत सुरू आहे. त्यांच्यामध्ये आरोग्याबाबत जनजागृतीसोबतच सामान्य नागरिकांचे अधिकार मिळावे म्हणून सोसायटीतर्फे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, नुकतेच सात वारांगनाचे पुनवर्सन म्हणजे त्यांची लग्न लावून देण्यात आली तर सात वारांगनाना शिक्षणाकडे वळते करण्यात सोसायटीला यश आले आहे.
१९६० मध्ये स्थापन झालेली नागपुरातील ‘इंडियन रेडक्रॉस सोसायटी संस्था’ पूर्वी सदर रोडवर कार्यरत होती. या मार्गाला आजही ‘रेडक्रॉस रोड’ असेही संबोधले जाते. त्यानंतर वर्षे २००० पासून या संस्थेचे कार्य गंगाजमुना या वारांगनांची वस्ती असलेल्या जुन्या मंगळवारीत सुरू झाले. येथील वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम ही संस्था करीत आहे. ‘रेडक्रॉस’ने वारांगनांशी नात्याची वीण घट्ट केली आहे.
जगातील सर्व देशांचा सहभाग असलेल्या या संघटनेची सुरुवात मुळात युद्धात जखमी आणि आजारी सैनिकांची देखभाल करण्याच्या उद्देशातून सुरू झाली; परंतु पुढे व्यापक सेवाधर्माचा वसा या संस्थेनं जगभरात पेरला. प्रत्येक शहरात सेवाधर्माचा वेगळा पैलू रेडक्रॉस संस्थेने जोपासला आहे. नागपुरात ही संस्था सध्याच्या स्थितीत अडीच हजार वारांगनांना विविध सोई उपलब्ध करून त्यांना मदतीचा हात देत आहे. त्यांच्यात एचआयव्हीबाबत जनजागृती करणे, निरोधचे वाटप करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत गुप्तरोगाची माहिती देऊन औषधोपचारासाठी मदत करणे, त्यांना नागरी सोयी उपलब्ध करून देण्यास मदत करणे, यात राशनकार्ड मिळवून देणे, आधार कार्डसाठी मदत करणे आदी सोई दिल्या जात आहे. वारांगनांच्या आयुष्यातील अनारोग्याचा अंधार दूर करण्यासाठी ‘रेडक्रॉस’ जणू प्रकाशदीप ठरली आहे. या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी आहे.