१२ एप्रिलपासून तुमसर बालाघाट तुमसर पॅसेंजरला रेड सिग्नल; हजारो प्रवाशांची गैरसोय
By नरेश डोंगरे | Published: April 5, 2024 08:28 PM2024-04-05T20:28:06+5:302024-04-05T20:28:23+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय
नागपूर : भंडारा जिल्ह्यातून चालविण्यात येणाऱ्या तुमसर-बालाघाट-तुमसर डेमू स्पेशल पॅसेंजरला रेड सिग्नल देण्यात आला आहे. येत्या १२ एप्रिलपासून पुढच्या अनेक दिवसांपर्यंत ही गाडी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी ही माहिती दिली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात भंडारा जिल्ह्यातून ही गाडी बालाघाटपर्यंत चालविण्यात येते. रेल्वे मंत्रालयाने या मार्गावरील विकासकामाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, दपूम रेल्वेकडून तुमसर ते बालाघाट या रेल्वे मार्गावर विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहे. या ट्रॅकच्या देखभालीचेही काम केले जाणार आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी नेमका किती दिवसांचा कालावधी लागणार, हे स्पष्ट नाही. मात्र, कामे सुरू असताना या गाडीचे संचालन सुरू ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही कामे पूर्ण होईपर्यंत गाडी नंबर ०७८१३/ ०७८१४ तुमसर-बालाघाट-तुमसर डेमू स्पेशल पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय दपूम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
विशेष म्हणजे, ही रेल्वे गाडी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन प्रांतातील सीमेवर राहणाऱ्या प्रवाशांच्या, रोजगाराच्या निमित्ताने इकडून तिकडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त रेल्वेगाडी आहे. अनेक बालाघाटी कामगार या गाडीने महाराष्ट्राच्या सीमेवरच्या गावात कामासाठी, बाजारहाट करण्यासाठी, उपचारासाठी येतात आणि काम संपताच परतीच्या गाडीने परत जातात. हाच प्रकार महाराष्ट्राच्या सीमांवरील अनेक कामगारांच्या बाबतीतही आहे. आता येण्या-जाण्याच्या दोन्ही गाड्या बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आल्याने दोन्ही प्रांतातील गरीब, कामगार वर्गांची गैरसोय होणार आहे.