मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला रेड्डींचा विरोध
By admin | Published: December 23, 2015 03:37 AM2015-12-23T03:37:08+5:302015-12-23T03:37:08+5:30
रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी वर्धा मार्गावरील कालाडोंगरी येथील ५० एकर जागा देण्याची घोषणा .....
कालिदास विद्यापीठाला
नागपुरात जागा देऊ नका
नागपूर : रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी वर्धा मार्गावरील कालाडोंगरी येथील ५० एकर जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपुरात विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला भाजपचे रामटेकमधील आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत जोरदार विरोध केला. रामटेक किंवा परिसरातच विद्यापीठाला जागा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचे मुख्य केंद्र रामटेकमध्येच राहणार असून संस्कृतच्या विकासासाठी नागपुरात उपकेंद्र करीत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही रेड्डी यांचा विरोध कायम राहिला.
रेड्डी यांनी विधानसभेत यासंबंधीची लक्षवेधी सूचना मांडली. रेड्डी म्हणाले, संस्कृत विद्यापीठ स्थापन करताना रामटेक नगरधन रस्त्यावरील मौजा परसोडा येथील ३१.७७ हेक्टर जागा संपादित करण्यासाठी १९७७ मध्येच मान्यता देण्यात आली होती. यापैकी फक्त ३.३२ हेक्टर जागा संपादित करून विद्यापीठाची प्रशासकीय वास्तू उभारण्यात आली. रामटेक व परिसरातच विद्यापीठासाठी ५० ते ६० एकर जागा सहजपणे उपलब्ध असताना नागपुरातील वर्धा मार्गावरील कालाडोंगरी येथे जागा का देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
चरण वाघमारे, सुनील केदार यांनीही हा प्रश्न लावून धरला. यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ रामटेक येथेच राहणार आहे.
विद्यापीठाचा विस्तार होणार
नागपूर : राज्यभर विद्यापीठाची उपकेंद्रे करायची आहेत, असे स्पष्ट केले. मात्र, रेड्डी यांचे समाधान झाले नाही. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावे लागले. केदार यांना उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या १५ वर्षात या विद्यापीठासाठी सरकारने एक नवा पैसा दिला नाही. तावडेंनी तर निधी व जमीन दिली. कवी कालिदास यांचा रामटेकशी असलेला संबंध सर्वांना माहीत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे.
मुख्यालयही तेथे आहे. मात्र, या विद्यापीठाचा अकोल्यापेक्षा मोठा कॅम्पस नागपुरात आहे. अशाच प्रकारे संस्कृत विद्यापीठाचा विस्तार करण्याचा सरकारचा मानस व्यक्त करीत त्यासाठी सरकार निधी देईल, असे त्यांनी आश्वस्त केले.(प्रतिनिधी)