रेडिरेकनर दरवाढ, मालमत्ता खरेदी महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:59 AM2020-09-12T00:59:08+5:302020-09-12T01:00:48+5:30
रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मागणीच्या विपरित राज्य शासनाने शुक्रवारी रेडिरेकनर (जमिनीचे सरकारी मूल्य) दरात वाढ केली आहे. राज्यात सरासरी १.७४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यात ०.६० टक्के वाढ झाली आहे. मनपा क्षेत्रात ०.१ टक्के जास्त द्यावे लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मागणीच्या विपरित राज्य शासनाने शुक्रवारी रेडिरेकनर (जमिनीचे सरकारी मूल्य) दरात वाढ केली आहे. राज्यात सरासरी १.७४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यात ०.६० टक्के वाढ झाली आहे. मनपा क्षेत्रात ०.१ टक्के जास्त द्यावे लागेल.
राज्य शासनाने मनपा क्षेत्रात १.०२ टक्के वाढ केली आहे. केवळ मुंबई आणि उपनगरात रेडिरेकनरचे दर कमी केले आहेत. आता या ठिकाणी ०.६ टक्के दर कमी लागणार आहे. परंतु नागपूरसह संपूर्ण विदर्भात दरवाढ केली आहे. नागपूर ग्रामीण क्षेत्रात हे दर १.१३ टक्के वाढले आहेत. तर नगरपालिका क्षेत्रात ०.७७ टक्के वाढ झाली आहे. विदभार्तील अन्य जिल्ह्याची वाढ पाहता अमरावतीमध्ये सरासरी १.६२ टक्के, अकोला १.७०, वाशिम १.९९, यवतमाळ १.६२, बुलढाणा १.४५, चंद्रपूर ०.९७, वर्धा ०.८७, भंडारा ०.०५, गोंदिया ०.२२ आणि गडचिरोली ०.८३ टक्के वाढ झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेडिरेकनर दर कमी करण्याची मागणी करीत होते. मुद्रांक शुल्कात झालेल्या कपातीने याचे संकेत मिळाले होते. परंतु महसुलात होणारी घट टाळण्यासाठी शासनाने रेडिरेकनर दर वाढविले. या निर्णयाने रिअल इस्टेट क्षेत्रात निराशा आहे. सध्या बांधकाम क्षेत्राची स्थिती पाहता शासनाने दर कमी करायला हवे होते.