पाठीवरील ओझे कमी करा
By admin | Published: October 28, 2015 03:21 AM2015-10-28T03:21:41+5:302015-10-28T03:21:41+5:30
कष्टकरी माथाडी कामगार हा नेहमीच उपेक्षितही राहिला आहे. तो वर्षभर पाठीवर ओझे वाहतो.
माथाडी कामगारांची मागणी : वर्षभर मिळावे काम
नागपूर : कष्टकरी माथाडी कामगार हा नेहमीच उपेक्षितही राहिला आहे. तो वर्षभर पाठीवर ओझे वाहतो. दिवसरात्र राबतो. मात्र त्याच्या या कष्टाला कधीच योग्य मोल मिळालेले नाही. त्याच्या कामाला प्रतिष्ठा नाही. मान-सन्मान नाही. कुणी दोन चांगले शब्दसुद्धा बोलत नाही. उलट त्याच्या पाठीवर स्वत:च्या वजनापेक्षा दुप्पट म्हणजे, शंभर-सव्वाशे किलोचे ओझे दिल्या जाते. हा क्रूरपणा थांबविण्यासाठी मागील ४० वर्षांपासून तो संघर्ष करीत आहे. परंतु अद्याप त्यात त्याला यश मिळालेले नाही. आजही कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी बाजारात या कामगारांच्या पाठीवर शंभर-सव्वाशे किलोचे ओझे लादल्या जाते. मागील वर्षानुवर्षांपासून सुरू असलेला हा क्रूरपणा कधी थांबणार! असा सवाल महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’च्या मंचावर उपस्थित केला.
माथाडी कामगार नेते बाबा आढाव यांनी कष्टकरी कामगारांच्या संरक्षणासाठी गत १९७४ मध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, ही संघटना उभी केली. या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विखुरलेला कष्टकरी कामगार एकजूट करण्यात आला. त्यातून आज या संघटनेशी राज्यभरातील दोन लाखांपेक्षा अधिक कष्टकरी कामगार जुळले आहेत. ही संघटना मागील ४० वर्षांपासून या माथाडी कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे. सरकारने या घटकाला संरक्षण देण्यासाठी मागील १९६९ मध्ये ‘माथाडी कामगार कायदा’ तयार केला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, तो संपूर्ण राज्यात लागू होण्यासाठी ४० वर्षांचा काळ लागला. आज हा कायदा संपूर्ण राज्यात पोहोचला. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी कुठेही होताना दिसून येत नाही. माथाडी कामगारांचा राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताच भार नाही. त्यांच्या मजुरीतून कपात करण्यात येणाऱ्या ३० टक्के लेव्हीतूनच त्याला सोयी-सुविधा दिल्या जातात. मग असे असताना, हा घटक उपेक्षित का? असा प्रश्न यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश धुरट यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, माथाडी कामगार हा नेहमीच शोषित राहिला आहे. कधी भांडवलदार तर ठेकेदारांनी या वर्गाचे नेहमीच शोषण केले आहे. या चर्चेत डॉ. हरीश धुरट यांच्यासह राहुल वेळे, मणिराम रडके, हरिभाऊ कावळे, हरी चटप, कुशन राऊत, सुनीता शाहू, कौशल्या शाहू, मुद्रिकाप्रसाद पाठक व देवराव आंबटकर यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)