विजेचे दर निम्मे करा, शेतीपंपाचे लोडशेडिंग संपवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:25 PM2020-01-20T22:25:52+5:302020-01-20T22:28:10+5:30
भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी प्रस्तावित वीज दरवाढीचा निषेध करण्यात आला.
शेतीपंपाला वीजबिलातून मुक्त करण्यात यावे, स्थिर आकार, वीज वहन कर आदी बंद करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास वीज बिल भरू नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. देशात सर्वाधिक महाग वीज महराष्ट्रातच आहे. दिल्लीमध्ये २०० युनिटपर्यंत वीज बिल नाही. हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांत विजेचे दर कमी आहेत. तेव्हा महाराष्ट्र आणि विदर्भालाच वीज महाग का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. सातत्याने वीज दरवाढ केली जाते. हा भ्रष्टाचार आहे. महावितरण ५३ हजार कोटी रुपयाच्या तोट्यात असल्याचे सांगितले जाते. याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. मागणी निवेदन मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात आले.
या धरणे आंदोलनात समितीचे प्रमुख अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवस खांदेवाले, मुकेश मासूरकर, अरुण केदार, राजेंद्र आगरकर, सुनील वडस्कर, गुलाबराव धांडे, वृषभ वानखेडे, नीळकंठराव घवघवे, विठ्ठलराव काकडे, श्रीराम अंबाडकर, विजया धोटे, प्रवीण राऊत, पुरुषोत्तम हगवणे, प्यारुभाई नौशाद आली, अरविंद बोरकर, बाबुराव गेडाम, विष्णुजी आष्टीकर, रामेश्वर मोहबे, जगदीश मोकुलवार, बाबा राठोड, अरुण खंगार, भाग्यश्री मते, कल्पना मते, अण्णाजी राजेधर, रामदास राऊत, शाहीर कोठेकर, वसंतराव वैद्य, अरविंद भोसले, विजय मौंदेकर, पांडुरंग बिजवे, रजनी शुक्ला, सोनम कुमरे, तेजस चोरे आदी उपस्थित होते.