तोटा कमी करण्यासाठी बस सीएनजीवर चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:40 AM2018-08-05T01:40:36+5:302018-08-05T01:43:01+5:30
नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी आयोजित शहर बस आढावा बैठकीत दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी आयोजित शहर बस आढावा बैठकीत दिलेत.
वर्ष २००७ पूर्वी शहर बससेवा ही राज्य सरकारमार्फत संचालित केली जात होती. त्यानंतर, महापालिकांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिकेने वंश निमय कंपनीकडे शहर बस सेवा सोपविली़ मात्र ही कंपनी बससेवा चालविण्यात अपयशी ठरली़ परिणामी वंश सोबतचा करार रद्द करण्यात आला़ गतवर्षी मनपाने तीन नवीन आॅपरेटर नेमून त्यांच्याकडे शहर बस सेवा सोपविली़ शहरातील स्टार बस (रेड बस) या तिन्ही आॅपरेटरला विभागून देण्यात आल्या़ तर ग्रीन बस स्कॅनिया कंपनी चालवित आहे़ त्यानंतरही तोटा वाढत असल्यामुळे काही मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या़ तसेच तिकिटाचे दर वाढविण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेतली़ नागरिकांना चांगली सेवा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असल्याने ग़्रीन बस सेवा देखील बंद करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप तसेच शहर बससेवा सांभाळणारे सर्व आॅपरेटर उपस्थित होते़
बस भाडे वाढणार
डिझेलचे दर वाढत असल्याने शहर बसच्या तोट्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात १८ ते २० टक्के प्रस्तावित आहे. बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेपासून भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला आहे. या प्रस्तावाला गडकरी यांच्याकडून सहमती घेतली जाणार आहे.