गरजा कमी करा, जीवनाचे गणित सुटेल
By Admin | Published: March 16, 2015 02:35 AM2015-03-16T02:35:36+5:302015-03-16T02:35:36+5:30
घरची परिस्थिती बेताची. वडील कपडे डोक्यावर घेऊन बाजारात विकायला जायचे. हळुहळू परिस्थिती बदलली अन् वडिलांनी चांगले दुकान थाटले.
नागपूर : घरची परिस्थिती बेताची. वडील कपडे डोक्यावर घेऊन बाजारात विकायला जायचे. हळुहळू परिस्थिती बदलली अन् वडिलांनी चांगले दुकान थाटले. पैसाही मिळू लागला. परंतु वडिलांनी मेहनत कमी केली नाही. एवढा पैसा कशाला हवा, असा विचार मनात आला आणि पैशांचा तिरस्कार वाटायला लागला. त्यामुळे गरजा कमी केल्या की जीवनाचे गणित नक्की सुटते, असे मत प्रयार सेवांकुर संस्थेचे अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.
प्रयास सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट व स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बी. आर. ए. मुंडले सभागृहात आयोजित ‘आम्ही बिघडलो ! तुम्ही बी घडाना’ या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. आल्हाद काशीकर आणि मनोज गोविंदवार यांनी हसतखेळत त्यांना बोलते केले. अविनाश सावजी म्हणाले, बुलडाण्यातील सिंदखेडराजात मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. घरात आईवडिल, चार बहिणी आणि दोन भाऊ होते. वडील शिकलेले नसले तरी मुलांना शिकविले. दुकानात वडिलांना एकेका पैशाचा हिशेब जुळल्याशिवाय जमत नव्हते. त्यांच्यामुळे माझेही जीवनाचे गणित पक्के झाले. वडिलांच्या स्वभावात अहंकार होता. तोच स्वभाव मला लाभला. काही लोकांचा अहंकार त्यांना मोठा करतो. परंतु अहंकार कुठे बाळगायचा याचे भान हवे. बारावीत चांगले गुण मिळाल्याने नागपुरात एमबीबीएसला प्रवेश घेतला. चार मित्रांचा ग्रुप जमला. परंतु चांगले बोलता येत नसल्यामुळे कमीपणा वाटायचा. इंग्रजीतून शिकवत असल्यामुळे दोन महिने काहीच कळाले नाही. पहिल्याच युनिट टेस्टमध्ये पहिला आलो. आत्मविश्वास वाढू लागला. बाबा आमटे, संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांना मोठे व्यक्ती म्हणून नव्हे तर बालपणी ते कसे होते या दृष्टीने पाहुन त्यांनाच जीवनाचे कन्सलटंट केले. वडिलांच्या १५० रुपयांच्या मनिआॅर्डरमध्ये विवेकानंदांची पुस्तके घेतली. त्यामुळे जीवनच बदलले. उपाशी राहायला शिकलो. एमबीबीएस झाल्यावर पुढे शिक्षणाची इच्छा नव्हती. घरच्यांच्या दबावामुळे नोकरी स्वीकारली. ती सोडून अमळनेरला मोबाईल हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. त्यांनी भोपाळला कॅम्प घेतला. तेथे सोहोनीशी भेट झाली. तिच्या भावाचा मोठे हॉस्पिटल थाटण्याचा सल्ला आवडला नाही. सोहोनीच्या गावातच दवाखाना सुरू केला. आपल्या गरजा कमी करून सोहोनीशी लग्नाचा निर्णय घेतला.
लग्न झाल्यानंतर अमरावतीत एका खेड्यात १२०० रुपये महिन्यात काम सुरू केले. व्यवस्थापनाशी संघर्ष झाला. चांदूरबाजारला १८०० रुपये महिन्याने खोली भाड्याने घेतली. १९९४ ला प्रयास संस्था सुरू केली. सुरुवातीला ३ हजार वेतन मिळत होते. सध्या १२५०० रुपये वेतन घेतो. मागील वर्षी संस्थेची पहिली इमारत अमरावतीत उभारली. संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्य करण्यात येतात. जीवनात परीक्षा घेणारे अनेक क्षण येतात त्यामुळेच माणसाचा खरा विकास होतो.
पुढे आपण सुधारणार असे सोहोनीला वाटले त्यामुळे तिने लग्नास होकार दिला. परंतु तसे झाले नसल्यामुळे आजही आमची भांडणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘हृदय संवाद’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रगट मुलाखतीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)