स्टॅम्प ड्युटीत कपात कमी करा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:35+5:302021-04-02T04:07:35+5:30
- बांधकाम क्षेत्राला मिळेल बूस्ट : कपात कायम ठेवण्याची शासनाकडे मागणी नागपूर : कोरोना महामारीत बांधकाम क्षेत्रावर संकट आले ...
- बांधकाम क्षेत्राला मिळेल बूस्ट : कपात कायम ठेवण्याची शासनाकडे मागणी
नागपूर : कोरोना महामारीत बांधकाम क्षेत्रावर संकट आले तेव्हा राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटी ३ आणि ४ टक्क्यांची कपात केल्याने महसुलाचे लक्ष्य पूर्ण केले. १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्चपर्यंत असलेल्या कपातीचा फायदा सामान्यांचा झाला. ही कपात पुढे कायम ठेवण्याची मागणी राज्यातील बिल्डरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचा प्रकोप गेल्या वर्षीप्रमाणेच सुरू असताना शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे घर खरेदी-विक्री कमी झाल्याने राज्य शासनाचे महसुलाचे लक्ष्य पूर्ण होत नव्हते. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्टॅम्प ड्युटी ३ टक्के आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के कपात केली होती. हा एक चांगला निर्णय होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात शासनाचे महसुलाचे लक्ष्य दरवर्षीप्रमाणेच पूर्ण झाले आणि बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यावर गरजू लोकांनी घरे विकत घ्यायला सुरुवात केली. त्याचा फायदा झाला.
बांधकाम क्षेत्रात सहसा ३० ते ४० लाखांपर्यंतची घरे जास्त विकली जातात. ही घरे खरेदी करणारे सामान्यच असतात. बँकांमधून कर्ज घेऊन घर खरेदीची हिंमत करतात. तीन आणि चार टक्के कपात केली तेव्हा याच ग्राहकांनी पुढे येऊन घर खरेदी केली. तेव्हा त्यांना ३० लाखांवर ३ टक्के कपातीनुसार ९० हजार आणि ४ टक्के कपातीनुसार ६० हजारांचा फायदा मिळाला. असाच फायदा पुढे मिळत राहिल्यास सामान्य ग्राहक घर खरेदीसाठी पुढे येतील आणि बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळेल, असे मत बिल्डर्सनी व्यक्त केले. पुढे स्टॅम्प ड्युटीमध्ये राज्य शासन कपात करीत नसेल तर सामान्य घर खरेदी थांबवेल. केवळ गरजूच ग्राहक पुढे येतील. बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन आणि सामान्यांना घर खरेदी सवलतीच्या दरात करू द्यायची असेल तर शासनाने स्टॅम्प ड्युटी कपातीचा निर्णय पुन्हा घ्यावा, असे मत बिल्डर्सनी व्यक्त केले.
स्टॅम्प ड्युटी कपात करण्याची क्रेडाईची मागणी
सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत बिघडली आहे. ही स्थिती सहा महिने अशीच राहण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात ठेवून महाराष्ट्र क्रेडाईने राज्य शासनाकडे स्टॅम्प ड्युटीत कपात करण्याची मागणी केली आहे.
...तरच सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार
कोरोना काळात घर खरेदीसाठी कुणीही पुढे येत नाही. स्टॅम्प ड्युटीत कपात केल्यानंतरच ग्राहक पुढे आले. आता पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती झाली आहे. सामान्यांचे घराचे स्वप्न आणि महसुलाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीत कपात करावी.
महेश साधवानी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई मेट्रो.
स्टॅम्प ड्युटी पुढेही वाढवावी
बांधकाम क्षेत्राला बूस्ट आणि सामान्यांना फायदा होण्यासाठी राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटी कपात पुढेही वाढवावी. कपातीच्या काळात बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांना रोजगार व व्यवसाय मिळाला होता. कपातीमुळे शासनाचे नुकसान न होता, महसूल वाढला.
गौरव अगरवाला, सचिव, नागपूर क्रेडाई मेट्रो.