कोरोना रुग्णांची संख्या कमी; त्यानंतरही दुकानदारांवर वेळेचे निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:30+5:302021-06-19T04:06:30+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यूचा आकडा शून्यावर आला आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यूचा आकडा शून्यावर आला आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागपूर जिल्हा लेव्हल-१ मध्ये आहे. पण सुविधा लेव्हल-३ अंतर्गत देण्यात येत असल्याने दुकानदारांवर वेळेचे निर्बंध टाकण्यात आले आहेत. सिझन नसल्याने दुकानदार अजूनही आर्थिक संकटात आहेत. लेव्हल-१ अंतर्गत दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली.
अग्रवाल यांनी मंत्र्यांना ३ जून आणि १० जूनच्या साप्ताहिक डेटा विश्लेषणाच्या आधारावर नागपूर शहर आणि ग्रामीण क्षेत्र लेव्हल-१ करिता योग्य असल्याचे सांगितले. पण वेळेचे निर्बंध लावल्याने व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी अनेक समस्या येत आहेत. बाजारात गर्दी दिसून येत आहे, पण प्रत्यक्षरीत्या ग्राहक दुकानात खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे संकट आणखी वाढले आहे. दुकाने पूर्णवेळ सुरू राहिल्यास ग्राहक आणि दुकानदारांना खरेदी-विक्रीसाठी मुभा राहील. त्यामुळे राज्य शासनाच्या पाचस्तरीय मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब नागपूर जिल्ह्यात करावा आणि साप्ताहिक विश्लेषणाच्या आधारावर नागपूर जिल्ह्यातील वेळेचे निर्बंध दूर करावेत, अशी मागणी अग्रवाल यांनी राऊत यांच्याकडे केली.
संजय के. अग्रवाल म्हणाले, बिझनेस प्रोसेसेज आऊटसोर्स (बीपीओ), डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिसेस आणि त्याच प्रकारच्या कंपन्यांवर निर्बंध असल्याने युरोपिय आणि अन्य पश्चिमी देशांमधील आपल्या ग्राहकांना सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे या कंपन्यांना सूट देण्यासह रात्रीपर्यंत संचालन करण्याची परवानगी देण्यात यावी.
राऊत म्हणाले, नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दर कमी झाल्याने व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले. प्रतिनिधी मंडळात अशोक आहुजा, अशोक संघवी, दिनेश सारडा, धीरज मालू आणि गोपाल भाटिया उपस्थित होते.