भाज्यांची आवक कमी; किमती वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:49+5:302021-06-21T04:06:49+5:30
नागपूर : स्थानिक आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत ...
नागपूर : स्थानिक आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत सामान्यांचे महिन्याचे बजेट वाढले आहे. त्यातच भाज्यांच्या दरवाढीची भर पडल्याने महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ साधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एक महिन्यापूर्वी लॉकडाऊनमुळे भाज्यांची विक्री कमी होती. त्या तुलनेत आवक जास्त होती. ग्राहक मर्यादित भाज्या खरेदी करीत होते. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि हातठेल्यावर पदार्थ विकणाऱ्यांवर बंदी आणि लग्नकार्य बंद असल्याने भाज्यांचा उठाव कमी होता. स्थानिक शेतकऱ्यांकडून मालाची आवकही मागणीच्या तुलनेत जास्त होती. त्यामुळे भाज्या सामान्यांच्या आटोक्यात होत्या. शेतकऱ्यांची पेरणी आटोपल्यानंतरच भाज्यांची लागवड करतील. या भाज्या गणेशोत्सवात येतील. सध्या किरकोळ बाजारात पत्ता कोबी, टोमॅटो आणि वांगे वगळता सर्वच भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो आहेत. आणखी दोन महिने भाज्या जास्त भावात खरेदी कराव्या लागतील, असे मत महात्मा फुले फ़्रूट अॅण्ड सब्जी असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी व्यक्त केले.
सध्या फूलकोबी नागपूर जिल्हा, नाशिक आणि औरंगाबाद येथून कॉटन मार्केट आणि कळमना मुख्य बाजारात विक्रीसाठी येत आहे. सिमला मिरची टाटानगर, तोंडले व परवळ भिलाई व दुर्ग, टोमॅटो नाशिक, संगमनेर, हिरवी मिरची मौदा, परतवाडा व रायपूर, कोथिंबीर नागपूर जिल्ह्यालगतच्या मध्य प्रदेशच्या भागातून येत आहेत. फूलकोबी ४० ते ५० रुपये किलोवर गेली असून आवक वाढल्यास भाव कमी होतील. मेथीचे भाव ६० रुपयांवर गेले आहेत. पंढरपूर येथून आवक वाढल्यास भावात घसरण होईल. आता हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाल्याने विक्रीत वाढ झाली आहे. सध्या ठोक मार्केटची साखळी तुटली आहे. ती पूर्ववत होण्यास आणखी काही दिवस लागतील, असे राम महाजन म्हणाले.
रविवारी किरकोळ बाजारात किलो भाज्यांचे भाव :
फूलकोबी ४० रुपये, पत्ताकोबी २०, वांगे ३०, हिरवी मिरची ४०. टोमॅटो ३०, कोथिंबीर ५०, चवळी शेंग ४०. गवार ४०. कारले ४०. सिमला मिरची ४०. परवळ ४०. दोडके ३० ते ४०. कोहळे ४०. पालक १५ ते २०, मेथी ६०, चवळी २०, फणस ५०, कैरी ४०. काकडी ४०. मूळा ३०, गाजर ४०.
कांदे व बटाटे आटोक्यात; शासनाकडून कांदे खरेदी
पावसामुळे कांदे खराब झाले असले तरीही बाजारात आवक चांगली आहे. एक महिन्यापासून भाव ५० पैसे ते १ रुपयांनी वाढतच आहेत. रविवारी कळमन्यात ठोक बाजारात उत्तम दर्जाचे लाल कांदे २० ते २२ रुपये, पांढऱ्या कांद्याचे भाव १७ ते १८ रुपये किलो होते. लाल कांद्याची आवक बुलडाणा, अहमदनगर आणि नाशिक तर पांढरे कांदे अमरावती, अकोला आणि गुजरात येथून आहे. लाल कांदे दररोज १३ ते १५ ट्रक व पांढऱ्या कांद्याचे ५ ते ७ ट्रक येत आहेत. साठवणुकीच्या उन्हाळी कांद्याची खरेदी राज्य शासन नाफेडच्या माध्यमातून खरेदी करीत आहे. शेतकऱ्यांना जागेवरच २० ते २२ रुपये भाव मिळत आहे. शिवाय निर्यात वाढली आहे. त्यामुळे दसरा, दिवाळीपर्यंत भाव कमी होणार नसल्याची माहिती कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. सध्या चांगल्या मालाचे शार्टेज असून कळमन्यात कमी दर्जाचे कांदे येत असून भाव १२ ते १५ रुपये आहेत. हा कांदा जास्त दिवस टिकत नाहीत.
कळमन्यात बटाट्याची आवक आग्रा व कानपूर येथून असून दररोज २० ते २२ ट्रक येत आहे. ठोकमध्ये किलो भाव १२ ते १३ रुपये आहे. यंदा बटाट्याची उत्पादन मोठ्या प्रमाणात आल्याने वाढण्याची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.