पुरवणी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात घट
By admin | Published: August 15, 2015 03:09 AM2015-08-15T03:09:37+5:302015-08-15T03:09:37+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते.
नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांना ‘ई-मेल’वर मिळणार उत्तरपत्रिकांची प्रत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते. विशेषत: एखाद्या पेपरमध्ये जरी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी त्याला पूर्ण परीक्षा शुल्क भरावे लागते व नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन विद्यापीठाने पुरवणी परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावानुसार पुरवणी परीक्षेसाठी एकूण परीक्षा शुल्काच्या २५ ते ३० टक्के रक्कमच विद्यार्थ्यांकडून घेण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. परंतु विषयनिहाय किंवा पेपरनिहाय परीक्षा शुल्क घेण्यात यावे, असे अनेक सदस्यांचे मत आहे. त्यामुळे नेमके शुल्क किती असावे, याबाबत विद्वत परिषदेत सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. दरम्यान, प्राधिकरणे ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त होणार असल्याने विद्यापीठात बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. २१ आॅगस्ट रोजी विद्वत परिषदेची बैठक झाल्यानंतर २६ आॅगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे.(प्रतिनिधी)
फेरमूल्यांकन प्रक्रिया होणार वेगवान
हिवाळी परीक्षेपासून फेरमूल्यांकनाची प्रक्रिया वेगवान होणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. नोंदणी अर्ज भरताना ‘एमकेसीएल’ कडून विद्यार्थ्यांचे ‘ई-मेल’ तसेच मोबाईल क्रमांक घेण्यात येत आहेत. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होणार आहेत. विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ‘स्कॅन’ झालेल्या उत्तरपत्रिकेची प्रत लगेच त्यांच्या ‘ई-मेल’वर पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
गुणपत्रिका लवकरच देणार
निकाल लागून पंधरवडा ओलांडल्यावर अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. कोऱ्या गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या हातात काही गुणपत्रिका पडत नसल्याची बाब समोर आली. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. परंतु आता अंतिम वर्षाच्या सर्व गुणपत्रिका ‘प्रिंटिंग’ला गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिले अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकांना प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतरच उर्वरित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.