उपराजधानीत थंडीची ‘रिएन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:02 AM2019-02-11T10:02:14+5:302019-02-11T10:03:51+5:30
मध्य भारतात थंडीची लाट पसरल्याने दोन दिवसात पारा १० अंशाने घटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारतात थंडीची लाट पुन्हा पसरली आहे. त्याचा परिणाम उपराजधानीवरही झाला आहे. डिसेंबर महिन्या थंडीने रेकॉर्ड केला होता. तापमान ३.४ पर्यंत पोहोचले होते. जानेवारीच्या शेवटीही पारा घसरला होता. फेब्रुवारी उजाडताच पारा पुन्हा चढला. मध्य भारतात थंडीची लाट पसरल्याने दोन दिवसात पारा १० अंशाने घटला आहे.
जानेवारीच्या शेवटी शेवटी थंडीने उपराजधानीला चांगलेच गारठले होते. तेव्हा किमान तापमान ३.४ डिग्रीने खाली घसरले होते. कमाल तापमानही १०.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले होते. पण फेब्रुवारी उजाडताच तापमानात वाढ झाली.
१ फेब्रुवारीला उपराजधानीचे किमान तापमान ६.३ सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यानंतर पारा वाढतच गेला. २ फेब्रुवारीला किमान तापमान ९.२, ३ व ४ फेब्रुवारीला १२.१, ५ फेब्रुवारीला ११.३, ६ व ७ फेब्रुवारीला ११.२ नोंदविण्यात आले. ८ फेब्रुवारीचे तर किमान तापमान १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र मध्य भारतात थंडीची लाट पसरली. अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीही झाली. त्यामुळे गार वारे वाहू लागले. दुपारच्या वेळीही थंडी जाणवू लागली. त्यामुळे ९ फेब्रुवारीला ८.९ व १० फेब्रुवारीला ६.३ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणारे दोन दिवस उपराजधानीचे वातावरण कायम राहणार आहे.