ग्रामीण रुग्णालयात ‘रेफर टू नागपूर’ फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:49+5:302021-07-31T04:08:49+5:30

शरद मिरे/लोकमत भिवापूर : रुग्णांची बिघडलेली प्रकृती खाजगी दवाखान्यात सुधारत आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे बिघडलेले आरोग्य सुधारण्याचे नाव नाही. ...

‘Refer to Nagpur’ formula in rural hospitals | ग्रामीण रुग्णालयात ‘रेफर टू नागपूर’ फॉर्म्युला

ग्रामीण रुग्णालयात ‘रेफर टू नागपूर’ फॉर्म्युला

Next

शरद मिरे/लोकमत

भिवापूर : रुग्णांची बिघडलेली प्रकृती खाजगी दवाखान्यात सुधारत आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे बिघडलेले आरोग्य सुधारण्याचे नाव नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला कुणाची नजर लागली, असा सवाल आता विचारला जात आहे. किरकोळ रुग्णालाही ‘रेफर टू नागपूर’ करण्याचा हा फॉर्म्युला सामान्यांच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे.

कार्तिक शंकर कोहपरे (२३) रा. भिवापूर या डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णाला सोमवारी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर येथे सुविधा नसल्याचे कारण सांगत, येथील महिला डॉक्टरनी बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याला नागपूर मेडिकलमध्ये हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक घाबरले. लागलीच त्याला नागपूरला हलविण्यात आले. मात्र मेडिकलमधील डॉक्टरांनी रुग्णांची प्रकृती ठीक असून त्याला दाखल करण्याची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेता येईल, असे सांगितले. त्यामुळे सदर रुग्णाला त्याच रात्री ‌‌भिवापूरला परत आणले. सध्या या रुग्णावर स्थानिक खाजगी डॉक्टरच्या सल्ल्याने घरीच उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. सदर रुग्ण अत्यवस्थ नसताना अचानक त्याला ‘रेफर टू नागपूर’ करणे कितपत योग्य असा प्रश्न विचारला जात आहे. रुग्णालयात सुविधा नसल्यास त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सुयोग्य उपचार न केल्यास नातेवाईक प्रश्नांची सरबत्ती करतात. अशात रुग्णाला नागपूरला रेफर केल्यास जबाबदारीच संपते. त्यामुळेच सदर फॉर्म्युला वापरला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

शाब्दिक स्वागताने सारेच हतबल

येथील एक जबाबदार अधिकारी आक्रमक आहे. आपल्या शाब्दिक स्टाईलने त्या कुणाचे स्वागत कशा करतील याचा नेम नाही. यातून आजी माजी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीसुध्दा सुटलेले नाही. असाच प्रकार कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी सुध्दा होतो. त्यामुळे डॉक्टर वा कर्मचारी स्वत:च्या दिमतीवर कुठलेही काम करत नाही. वरिष्ठ सांगतील ती पूर्व दिशा असा नारा देत रुग्णाला थेट नागपूरला रेफर करतात.

--

नागरिकांच्या सुदृढ आरोग्याकरिता तालुकास्थळावर ग्रामीण रुग्णालय उभे करण्यात आले. मात्र येथील जबाबदार अधिकाऱ्यांच्या वर्तनाने रुग्णालयाचे आरोग्य बिघडले आहे. रुग्ण निव्वळ उपचारानेच नव्हे तर हिंमत आणि दिलास्यानेही बरे होतात. मात्र येथे चक्क रोखठोक शब्दांचे इंजेक्शन दिल्या जाते. कारण नसताना नागपूरला रेफर केले जाते.

- शंकर डडमल, जि.प.सदस्य, कारगाव सर्कल

-

यापूर्वी उपलब्ध साधनसामग्रीच्या बळावर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर वेळेत अपेक्षित उपचार व्हायचे. मात्र वर्षभरापासून रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अधिक्षकांच्या वर्तनाबाबत खा. कृपाल तुमाने यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी दखल घेत, कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या. मात्र त्यानंतरही आरोग्य व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही.

- संदीप निंबार्ते, तालुका प्रमुख शिवसेना

--

तालुक्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी गतकाळात प्रयत्न झाले. एवढेच नव्हे तर ट्रामा केअर सेंटर मंजूर करून सुसज्ज वास्तूही उभी केली. मात्र वर्षभरापासून रुग्णालयातील कारभाराबाबत तक्रारींचा ओघ वाढलेला आहे. याची तात्काळ दखल न घेतल्यास युवामोर्चाच्या स्टाईलने संबंधितांना जाब विचारला जाईल.

- रोहित पारवे, जिल्हा महामंत्री, भाजपा युवामोर्चा

300721\11.jpg

ग्रामिण रूग्णालय भिवापूर

Web Title: ‘Refer to Nagpur’ formula in rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.