विदर्भात रिफायनरी व्यवहार्य, पाण्याची कमतरता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:33+5:302021-07-03T04:06:33+5:30
कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेट्रोलियम मंत्रालयाने विदर्भात ऑईल रिफायनरीच्या प्रस्तावाच्याऐवजी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर भर दिला आहे. मंत्रालयाने ...
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोलियम मंत्रालयाने विदर्भात ऑईल रिफायनरीच्या प्रस्तावाच्याऐवजी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर भर दिला आहे. मंत्रालयाने त्याची तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश देऊन या दिशेने पाऊल उचलले आहे. दुसरीकडे रिफायनरीची सातत्याने मागणी करणाऱ्या वेदसह (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) अनेक तज्ज्ञांनी दावा केला आहे की, विदर्भात रिफायनरी होणे व्यावहारिक आहे. येथे पाण्याची कमतरता नसून पायाभूत सुविधादेखील उपलब्ध आहेत.
पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससाठी होत असलेल्या पुढाकाराने विदर्भातील औद्योगिक विकासाचा मार्ग खुला होण्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र रिफायनरीच्याऐवजी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर भर दिला जात असल्यामुळे समाधानी नाहीत. रिफायनरी समुद्रकिनाऱ्याजवळ व्यावहारिक असते, असा सरकारचा तर्क आहे. परंतु ही भूतकाळातील बाब झाली व तेव्हा पेट्रोलियम-पेट्रोकेमिकल पदार्थ आयात होत होते. आता समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या मथुरा, बिना, पानिपत व भटिंडा येथे रिफायनरी यशस्वीपणे कार्यरत आहेत.
विदर्भात ६० एमएमटीपीए क्षमतेची रिफायनरी स्थापन झाल्याने समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या रिफायनरीलादेखील फायदा होईल. सद्यस्थितीत देशातील खाजगी रिफायनरीच पेट्रोलियम उत्पादनांना देशाच्या बाहेर निर्यात करू शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या केवळ देशाची आवश्यकता पूर्ण करू शकतात. विदर्भात रिफायनरी आल्याने या रिफायनरीवर मध्य भारतात पुरवठा करण्याचा भार संपेल. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर स्थित रिफायनरीला अतिरिक्त फायदा होईल. विदर्भासह संपूर्ण मध्य भारत देशातील इतर भागाच्या तुलनेत पेट्रोकेमिकल उत्पादनांची जास्त मागणी आहे. रिफायनरीसोबतच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सलादेखील यामुळे बराच फायदा होईल.
भविष्यातील आवश्यकता ही विदर्भाची सर्वात जमेची बाजू आहे. पुढील १० वर्षांत देशातील ४ ते ५ रिफायनरी वाढते प्रदूषण व खर्चामुळे बंद होऊ शकतात. अशा स्थितीत विदर्भातील रिफायनरी देशाची आवश्यकता पूर्ण करण्यात सक्षम असेल.
कुठून येईल ४०० एमएलडी पाणी
-नागपूर महानगरपालिकेतून २०० एमएलडी पाणी मिळेल. यासाठी रिफायनरी मनपाला १०० ते १५० कोटी देईल.
-गोसीखुर्द व आजूबाजूच्या धरण व बंधाऱ्यातून उद्योगासाठी आरक्षित पाण्याचा उपयोग होत नाही. रिफायनरी या पाण्याला घेईल.
-विदर्भातील बहुतांश बांधांमधून काही वर्षांपासून गाळ व चिखल काढण्यात आलेला नाही. रिफायनरी १०० कोटी खर्च करून या बांधांना स्वच्छ करून पाणी संग्रह क्षमता वाढवेल. विदर्भ सिंचन विकास महामंडळाचा यामुळे फायदा होईल.
-वैनगंगा नदीचे पाणी तेलंगणात वाया जात आहे. रिफायनरी यातील २५ टक्के पाण्याचा उपयोग करेल.
-इतर रिफायनरीप्रमाणे विदर्भातील रिफायनरीदेखील स्वत:चा बांध तयार करेल. यात तीन महिन्याचे पाणी जमा राहील.
पायाभूत सुविधा उपलब्ध
रिफायनरीसाठी विदर्भात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांमुळे रिफायनरीला तयार मंच मिळेल. येथे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार होतो आहे. सोबतच विकसित विमानतळ असून, त्याची क्षमता वाढविली जाऊ शकते. एमआयडीसी व मिहानमध्ये जागा रिकामी आहे, अशी माहिती रिफायनरी-पेट्रोकेमिकल क्षेत्रातील तज्ज्ञ व वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी दिली.