बचत खात्यातून लांबवलेले ३.२५ लाख खातेदाराला परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:55 PM2017-12-01T19:55:42+5:302017-12-01T19:58:14+5:30
बँकांमधील यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असली तरी फसवणुकीच्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. असेच एक प्रकरण अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल झाले होते. त्या प्रकरणात एका राष्ट्रीयीकृत बँकेतील बचत खात्यातून अज्ञात व्यक्तीने विड्रॉल स्लीपद्वारे तब्बल ३ लाख २५ हजार रुपये काढून घेतले. ग्राहक पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. यात बँकेची चूक दिसून आल्यामुळे मंचने ग्राहकाची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश बँकेला दिला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बँकांमधील यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असली तरी फसवणुकीच्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. असेच एक प्रकरण अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल झाले होते. त्या प्रकरणात एका राष्ट्रीयीकृत बँकेतील बचत खात्यातून अज्ञात व्यक्तीने विड्रॉल स्लीपद्वारे तब्बल ३ लाख २५ हजार रुपये काढून घेतले. ग्राहक पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. यात बँकेची चूक दिसून आल्यामुळे मंचने ग्राहकाची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश बँकेला दिला आहे.
अब्दुल रशीद शेख अब्दुल्ला असे ग्राहकाचे नाव असून ते सतरंजीपुरा येथील रहिवासी आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या गांधीबाग शाखेत त्यांचे बचत खाते आहे. त्या खात्यातून ही रक्कम अवैधपणे काढून घेण्यात आली होती. अब्दुल रशीद यांना संबंधित रक्कम व त्या रकमेवर २० डिसेंबर २०११ ते रक्कम प्रत्यक्ष अदा होतपर्यंतच्या कालावधीत ६ टक्के व्याज देण्यात यावे असे मंचने आदेशात म्हटले आहे. तसेच, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता दहा हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यास सांगितले आहे. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी बँकेला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्य चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला आहे.
असा आहे घटनाक्रम
अब्दुल रशीद यांनी एप्रिल-२०११ मध्ये बचत खात्यात २५ लाख रुपये जमा केले होते. ते धनादेशामार्फत ही रक्कम उपयोगात आणत होते. २० जुलै २०११ रोजी ते ५० हजार रुपये काढण्यासाठी बँकेत गेले असता त्यांना खात्यामध्ये केवळ ३ हजार १६१ रुपयेच शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. त्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने १७ जून २०११ रोजी विड्रॉल स्लीपद्वारे ३ लाख २५ हजार रुपये काढून घेतले होते. त्यानंतर अब्दुल रशीद यांनी ही रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.