ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजाने परत करा : ग्राहक मंचचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 07:25 PM2019-08-29T19:25:09+5:302019-08-29T19:26:47+5:30

तक्रारकर्त्या ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यशश्री डेव्हलपर्सला दिला आहे.

Refund the consumer for one lakh rupees at 12 percent interest: Order of consumer forum | ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजाने परत करा : ग्राहक मंचचा आदेश

ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजाने परत करा : ग्राहक मंचचा आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देयशश्री डेव्हलपर्सला दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यशश्री डेव्हलपर्सला दिला आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण २५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कमही डेव्हलपर्सने द्यायची आहे. एक लाख रुपयावर २६ जुलै २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे.
मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. शिवशंकर बोकडे असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते नरेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. डेव्हलपरला निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, बोकडे यांनी यशश्री डेव्हलपर्सच्या मौजा सोमलवाडा येथील ‘आनंद रेसिडेंसी’ प्रकल्पातील एक सदनिका ५० लाख ५० हजार रुपयात खरेदी करण्याचा करार केला व बुकिंगसाठी एक लाख रुपये अदा केले. त्यानंतर कर्जासाठी अर्ज सादर करण्याकरिता इमारतीचा बांधकाम नकाशा, इमारत परवाना, आर. एल. लेटर इत्यादी दस्तावेजाची मागणी केली. तसेच, वर्तमानपत्रात सदनिका खरेदीची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. दरम्यान त्यांना इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे होत नसल्याचे आढळून आले. त्यासंदर्भात डेव्हलपरने त्यांचे समाधान केले नाही. त्यामुळे त्यांनी सदनिका खरेदी करण्यास नकार देऊन बुकिंगची रक्कम परत मागितली. ती रक्कम परत देण्यात आली नाही. परिणामी त्यांनी ग्राहक मंचमध्ये धाव घेतली होती.
मंचने नोटीस बजावल्यानंतर डेव्हलपरने लेखी उत्तर सादर करून तक्रारकर्त्याला एक लाख रुपये परत केले जाऊ शकत नाही असे सांगितले. तसेच, तक्रार मुदतबाह्य असल्याचा मुद्दा मांडून ती दंडासह खारीज करण्याची विनंती केली. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्णय दिला.
डेव्हलपरने सेवेत त्रुटी ठेवली
रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रारकर्ता बुकिंगचे एक लाख रुपये परत मिळण्यास पात्र असल्याचे दिसून येते. तसेच, डेव्हलपरने ही रक्कम परत न करून सेवेत त्रुटी ठेवली. ही कृती अनुचित व्यापार पद्धतीत मोडणारी आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आहे.

 

Web Title: Refund the consumer for one lakh rupees at 12 percent interest: Order of consumer forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.