तक्रारकर्त्या महिला ग्राहकाचे दीड लाख रुपये परत करा
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 16, 2024 05:06 PM2024-05-16T17:06:18+5:302024-05-16T17:07:00+5:30
Nagpur : ग्राहक आयोगाचा ताजश्री हाऊसिंग एजन्सीला आदेश
नागपूर : तक्रारकर्त्या महिला ग्राहकाचे १ लाख ५६ हजार २० रुपये ९ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ताजश्री हाऊसिंग एजन्सीला दिला आहे.
निनाबाई कावरे, असे तक्रारकर्त्या महिला ग्राहकाचे नाव असून त्या गोरेवाडा येथील रहिवासी आहेत. संबंधित रकमेवर १० जानेवारी २००६ पासून व्याज लागू करण्यात आले आहे. याशिवाय, कावरे यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी एकूण ३५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम ताजश्री एजन्सीनेच द्यायची आहे. आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी, सदस्य चंद्रिका बैस व बाळकृष्ण चौधरी यांनी हा निर्णय दिला.
तक्रारीतील माहितीनुसार, कावरे यांनी ताजश्री एजन्सीच्या बिडगाव येथील ले-आऊटमधील दोन प्लॉट खरेदी करण्यासाठी १० जानेवारी २००६ रोजी करार केला. त्यानंतर ताजश्री एजन्सीला वेळोवेळी एकूण १ लाख ५६ हजार २० रुपये अदा केले व प्लॉट्सचे विक्रीपत्र करून मागितले. परंतु, ताजश्री एजन्सीने नवनवीन कारणे सांगून विक्रीपत्र करून दिले नाही. परिणामी, कावरे यांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार अंशत: मंजूर करण्यात आली.