प्रशासकीय बदली झालेल्यांना कार्यमुक्त करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:09 AM2021-08-26T04:09:24+5:302021-08-26T04:09:24+5:30
नागपूर : शासनाच्या बदली धोरणानुसार आदिवासी विकास विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या; परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास नकार ...
नागपूर : शासनाच्या बदली धोरणानुसार आदिवासी विकास विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या; परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला जात आहे. प्रकल्प अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचा आरोप विभागाच्या कर्मचारी संघटनेचा आहे.
दरवर्षीप्रमाणे होणारी बदली प्रक्रिया यावर्षीसुद्धा शासनाच्या परिपत्रकान्वये समुपदेशनाने राबवण्यात आली. अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूरअंतर्गत आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील ९ प्रकल्पांमधील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देत अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांची मने जिंकली; परंतु अप्पर आयुक्तांनी दिलेल्या बदल्या आदेशाची पायमल्ली करत प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत कार्यालयप्रमुखांना बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये; अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या एकतर्फी भूमिकेबद्दल आदिवासी कर्मचारी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आदिवासी कर्मचारी संघटना सिटूचे शिष्टमंडळाने उपायुक्त दशरथ कुळमेथे यांची भेट घेतली. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न केल्यास १ सप्टेंबरपासून अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग, नागपूर कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.